डोंबिवली : कोरोनानंतरच्या दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा शहरात गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षाचे स्वागत साधेपणाने होणार आहे. कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी झाले तरी, निर्बंध कायम असल्याने यंदा नववर्ष स्वागत यात्रेऐवजी केवळ पालखी काढण्यात येणार आहे. यावेळी देखावे, चित्ररथांचा अभाव असणार आहे. मात्र, धार्मिक, सामाजिक उपक्रम होणार आहेत.
गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत यात्रा काढण्याची परंपरा डोंबिवलीतून सुरू झाली. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने यंदा ही यात्रा निघणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर श्री गणेश मंदिर संस्थानाच्या विश्वस्तांची बैठक नुकतीच झाली. त्यात यंदाच्या वर्षी नववर्ष स्वागत यात्रा न काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, पालखी काढण्यात येणार आहे. ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या जातील. यावेळी चित्ररथ आणि देखावे नसतील. मात्र धार्मिक व सामाजिक उपक्रम होणार आहेत. कोरोना नियमावलीचे पालन करून हे कार्यक्रम होतील, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले यांनी दिली.
‘लोकमत’चे वृत्त ठरले खरे
‘लोकमत’ने सर्वांत प्रथम वृत्त देताना शोभायात्रा निघेल; पण त्यात चित्ररथ नसतील. धार्मिक कार्यक्रम होतील, असे वृत्त प्रसिद्ध केले होते. ते खरे ठरले आहे.
कल्याण पश्चिमेत यात्रा नाही
राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरू आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश यावे, सामाजिक अंतर राखले जावे, यासाठी कल्याण संस्कृती मंचने कल्याण पश्चिमेत यंदा गुढीपाडव्याला नववर्ष स्वागत यात्रा न काढण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण संस्कृती मंचने सोशल मीडियाद्वारे तसे जाहीर केले आहे.