डोंबिवली: शहर जितकं सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिकरित्या प्रगल्भ तितकच क्रिडा क्षेत्रात देखील अग्रेसर आहे. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये नवनवीन विक्रम रचून अनेक डोंबिवलीकर अॅथलिट्सनी डोंबिवलीचं नाव सातासमुद्रापार पोहोचवलं आहे. अशातच २२ जानेवारीला अयोध्या धाम येथे प्रभू श्रीराम यांच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आपल्या डोंबिवलीतला आंतरराष्ट्रीय धावपटू, गिनीज बुक विक्रमवीर अल्ट्रा मॅरेथॉन रनर विशाक कृष्णस्वामीने दिल्ली ते अयोध्या हे अंतर धावत पार करण्याचं आव्हान स्वीकारलं आहे.
हे ६०० किमी अंतर तो केवळ ६ दिवसात पार करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. त्यांनी त्याच्या सरावाच्या ठिकाणी जाऊन भेट घेऊन त्याचे कौतुक केले. श्रीराम मंदिरासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने योगदान देत आहेच, पण आगळ्या-वेगळ्या पद्धतीने प्रभू श्रीरामांच्या चरणी सेवा वाहण्याचा चंग विशाकने बांधलाय. या कामगिरीतून एक नवा विक्रम त्याच्या नावावर होईल, असा विश्वास वाटतो असे चव्हाण म्हणाले. दिल्ली ते अयोध्या रनिंग ही कामगिरी पूर्ण करण्यासाठी आम्ही डोंबिवलीकर त्यांच्या पाठीशी नेहमीप्रमाणे आहोतच. प्रभू श्रीराम आणि बजरंगबली त्याला हे आव्हान पूर्ण करण्याचं आणि यशस्वी होण्याचं बळ देवोत ही प्रार्थना अशा शब्दात त्याला शुभेच्छा दिल्या.