डोंबिवली: देशाच्या सीमेवर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशाचे तसेच आपल्या सर्वांचे रक्षण करीत आहेत. अशा शुर सैनिकांप्रति कृतज्ञता म्हणून डोंबिवलीकर युवकाच्या पुढाकाराने कारगिलमध्ये वॉर मेमोरियल परिसरात ‘एक बंधन रक्षाबंधनाचा’ उपक्रम राबवण्यात आला. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातून २८ हजार राख्या आणि ७५० किलो मिठाई जमा झाली होती.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या डोंबिवली ते कारगिल प्रवासाला सुरुवात झाली होती. वे टू कॉजचे संस्थापक रोहित आचरेकर हा डोंबिवलीकर तरुण १७ वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे. तर गेल्या ५वर्षापासून रोहीत दुचाकीवर डोंबिवली ते जम्मू काश्मीर असा प्रवास करत आहे. यंदाच्या उप्रकमाचे वैशिष्ट्य म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि थेट परदेशातूनही जम्मूमध्ये काही नागरिकांनी राख्या पाठवल्याची माहिती रोहितने दिली.
देशासाठी सैनिक बलिदान देतात, ते घरापासून लांब राहतात. त्यांच्या बहिणीच्या राखीची ते आतुरतेने वाट पाहत असतात. देशावर कुठलेही मोठे संकट आले तर हेच सैनिक बांधव सर्वप्रथम मदतीसाठी धावून येतात. त्यांच्या या कार्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम सुरू केल्याचे रोहित म्हणाला. रोहित शाळेत असल्यापासून सैनिकांसाठी पोस्टकार्ड पाठवत आहे. मात्र हे पोस्टकार्ड सैनिकांपर्यंत पोहचते का नाही याबाबत काहीसा साशंक व्हायचो. म्हणून मग आपणच सैनिकांसाठी काहीतरी करण्याची भावना निर्माण झाली आणि त्यातून या उप्रकमाची निर्मिती झाली. तर रोहित आचरेकरसोबत वास्तुविशारद प्रेम देसाई आणि फायर फाईटर ससून गावडे हे त्याचे मित्रही या उपक्रमात सहभागी झाले होते. दरम्यान या उपक्रमामुळे कारगिलमधील भारतीय जवानांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता असेसांगण्यात आले.