डोंबिवली: ठाणे जिल्ह्याला आगामी रेल्वेच्या वेळापत्रकात जादाच्या लोकलफेऱ्या मिळणार असून लोकमतच्या हॅलो ठाणे कल्याण डोंबिवली पुरवणीत टिटवाळा, बदलापूर मार्गावरील १६ लोकलच्या वेळा बदलणे गरजेचे या मथळ्याखाली मांडलेल्या प्रवाशांच्या व्यथेची रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली. रेल्वे अधिकाऱ्यांनी उपनगरी रेल्वे प्रवासी संघटनेसमवेत मुंबईत बैठक घेतली, त्यामध्ये हे सकारात्मक आश्वासन दिले.
यावेळी झालेल्या चर्चेत नवीन वेळापत्रकामध्ये लोकल ट्रेन संख्या वाढ करणे विचाराधीन आहे, गर्दीच्या वेळी ठाणे - कसारा /कर्जत ट्रेन शटल सर्विस संख्या वाढ करण्याचे आश्वासन दिले आहे, डोंबिवली फलाट क्रमांक ३/४ वरील नवीन एक्सेलेटर १५आक्टोबरपासून सुरू करणार. डोंबिवली स्टेशनवर कायमस्वरूपी अँम्ब्युलन्स बाबत चर्चा केल्यानंतर पक्ष/दानशूर संस्था यांच्याकडून अँम्ब्युलन्स भेट देणार्यांची संघटनेने माहिती देण्याची विनंती रेल्वे अधिकाऱ्यांनी केली. सद्यस्थितीत १५ डबा ट्रेन तांत्रिकदृष्ट्या वाढविणे शक्य नसल्याने १२ डबा ट्रेन वाढविण्याचे आश्वासन दिले. कसारा स्टेशनवर अजून दोन मेल/एक्सप्रेस थांबा देण्याबाबत आश्वासन दिले आहे.
अपघात रोखण्यासाठी अद्ययावत सिग्नल यंत्रणा संदर्भात प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. महासंघाकडून फर्स्टक्लास /एसी ट्रेन मध्ये टिसी पाठविण्याची मागणी केली, ती त्यांनी तात्काळ मान्य।केली असून फरक दिसून येईल असे सांगितले. तसेच महिला डब्यांमध्ये व उपनगरीय रेल्वे फलाटावर फेरीवाल्यांना बंदी घालण्याची मागणी केली आहे, त्यावर कार्यवाही होईल असे सांगण्यात आले.कर्जत स्थानकात।देखील मेल।एक्स्प्रेस गाड्या थांबवणेबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. संध्याकाळी ठाणे स्टेशनवरून ठाणे ते कर्जत, कसारा तसेच ठाणे ते बदलापूर, आसनगांव, /टिटवाळा ट्रेनची मागणी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.