डोंबिवलीः दरवर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी येथील पुर्वेकडील फडके मार्गावर तरुणाईचा सळसळता उत्साह पहायला मिळतो. परंतू यंदा कोरोनाचे सावट असल्याने दिवाळी पहाटच्या निमित्ताने याठिकाणी कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिपावलीच्या दिवशी नेहरू रोड, फडके रोड तसेच डोंबिवली शहराच्या अन्य ठिकाणी एकत्र येऊन गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
यासंदर्भातले जाहीर फलक मुख्य चौकात पोलीस विभागाकडून लावण्यात आले असताना केडीएमसी फ प्रभागाच्या वतीने आणि पोलीस विभागाच्या वतीने उदघोषणेच्या माध्यमातून नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आले. आजच्या घडीला केडीएमसी परिक्षेत्रातील कोरोना रूग्ण संख्या कमी झाली असलीतरी कोरोनाच्या दुस-या लाटेची शक्यता पाहता दिवाळी सणावरही हे सावट कायम राहीले आहे. दिवाळीला पहाटेपासून फडके रस्त्यावर मोठया प्रमाणावर तरूण-तरूणी एकत्रित येऊन शुभेच्छांची देवाणघेवाण करीत असतात.
तत्पूर्वी येथील गणपतीच्या मंदिरात जाऊन श्री गणेशाचे दर्शन करून दिवाळी साजरी करण्याची परंपरा गेली अनेक वर्षापासून याठिकाणी पहायला मिळते. परंतू यंदा जमावबंदीचा आदेश लागू करीत सांस्कृतिक कार्यक्रम होणार नसल्याचे पोलीस विभागाने स्पष्ट केले आहे. पोलीस विभागाने आणि केडीएमसीने आज फडके मार्गावर उदघोषणा करुन गर्दी न करण्याचे आवाहन केले. फटाक्यांची आतषबाजी करण्यासाठी येऊ नका. नियम पाळा अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.