लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली : कल्याणमध्ये काही महिन्यांपूर्वी मराठी विरुद्ध अमराठी वाद उफाळला असताना आता इंग्रजी बोलण्यावरून डोंबिवलीत वाद उफाळून आला. ‘एस्क्युज मी बोलू नको, मराठीत बोल,’ असे सांगितल्याने उद्भवलेल्या वादात तीन तरुणींना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी विष्णुनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पश्चिमेकडील जुनी डोंबिवली परिसरातील गणेशश्रद्धा इमारतीत हा प्रकार सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. बी विंगमध्ये राहणाऱ्या पूनम गुप्ता या गीता चौहान या मैत्रिणीबरोबर दुचाकीवरून रात्री पावणेदहाच्या सुमारास घरी येत होत्या. त्यावेळी अनिल पवार आणि त्यांची पत्नी ये-जा करण्याच्या रस्त्याच्या मधोमध उभे होते. तेव्हा पूनम यांनी त्या दोघांना बाजूला होण्याच्या उद्देशाने ‘एस्क्युज मी’ असे म्हटले. यावर त्या दोघांनी ‘तुम्ही इंग्लिशमध्ये बोलायचे नाही. मराठीत बोला,’ असे सांगून पूनम आणि गीता यांना मारहाण केली. यावेळी तेथे आलेल्या गीता यांच्या बहिणीलाही त्यांनी मारहाण केली.
दरम्यान, पवार यांचे नातेवाईक असलेले आणि इमारतीत ए विंगमध्ये राहणारे बाबासाहेब ढबाले आणि त्यांचा मुलगा रितेश घटनास्थळी आले. त्या दोघांनीही मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत पूनम आणि गीता यांनी केला आहे.