मुरलीधर भवार, कल्याण : कल्याण पूर्व भागातील महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालयाशेजारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण येत्या रविवारी १० मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आज या ठिकाणी कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी पाहणी केली.
याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष अण्णा रोकडे, सचिव सुमेध हुमणे, खजिनदार शेखर केदारे आदी मान्यवर उपस्थीत होते. रविवारी दुपारी साडे तीन वाजता सूचक नाका येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या निमित्त सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या भीम गीतांचा कार्यक्रम आयोोजित करण्यात आला आहे.
ड प्रभाग कार्यालयाशेजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचे काम सुरु आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. या स्मारकासमोर उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळयाचे अनावरण होईल. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून हे स्मारक साकारले जात आहे. वर्षभरात स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल असे त्यांनी आश्वीत केले होेते. स्मारकाचे लोकार्पण येत्या १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी होऊ शकते.
दरम्यान, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी हिललाईन पोलिस ठाण्यात एका जमीनीच्या वादातून कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. त्यात महेश गायकवाड हे जखमी झाले होते. त्यांच्या उपचार पार पडल्यावर त्यांना नुकतेच घरी सोडण्यात आले. त्यानंतर आज महेश गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची पाहणी केली आहे.