कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका नेहमीच नागरीकांना थकीत कर भरण्याचे आवाहन करत असते. मात्र, आता खुद्द केडीएमसीने वीज बिल थकीत ठेवलं असल्याची बाब पुढे आली आहे. बिल भरलं नाही म्हणून केडीएमसीच्या सिग्नल यंत्रणेची वीजपुरवठा खंडित करत महावितरणाने केडीएमसीला शॉक दिला. बिल न भरल्याच्या कारणास्तव खंडीत करण्यात आलेला सिग्नल यंत्रणेचा वीज पुरवठा महावितरणकडून रात्रीलाच पूर्ववत करण्यात आला. त्यामुळे आज सकाळपासून इथली सिग्नल यंत्रणा पुन्हा पूर्ववत सुरू झाली आहे.
बिल भरलं नाही म्हणून कल्याण पश्चिमेतील लालचौकी येथील सिग्नल यंत्रणेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचा प्रकार काही जागरूक नागरीकांनी उघडकीस आणला. केडीएमसी प्रशासनाने तातडीने सूत्र हलवत महावितरणशी संपर्क साधला आणि त्यानंतर गुरुवारी रात्री 10.30 च्या सुमारास महावितरण कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा पुन्हा सुरळीत केला. लालचौकी येथील सिग्नलचे 136 दिवसांचे 11 हजारांचे बिल पालिकेकडे थकीत होते. शुक्रवारी सकाळपासून सिग्नल यंत्रणा पून्हा सुरू झाल्याने नागरीकांमधून समाधान व्यक्त होत आहे.