मुरलीधर भवार, कल्याण : इमारतीमध्ये पार्किंगवरून सुरू असलेल्या वादामुळे मानसिक तणावातून एका होमगार्डने टिटवाळा स्टेशन जवळच रेल्वे ट्रॅकवर लोकल खाली झोकुन देत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. भूषण मोरे असे या होमगार्डचे नाव आहे. तो ठाणे रेल्वे पोलीस मध्ये कार्यरत होता. भूषणच्या मृतदेहाजवळ कल्याण रेल्वे पोलिसांना सुसाईड नोट मिळाली. यामध्ये भूषण राहत असलेल्या इमारतीमध्ये पार्किंगच्या वादातून चार जणांनी त्याला मानसिक त्रास दिल्याने त्याने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलण्याचे लिहिले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कल्याण रेल्वे पोलिसांनी भूषणच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
टिटवाळा येथील उमया ग’लेक्सी या इमारतीत राहणारा भूषण मोरे हा होमगार्ड ठाणे रेल्वे पोलीसमध्ये कार्यरत होता. भूषण राहत असलेल्या इमारतीमध्ये भूषणचे गाडी पार्किंग वरून चार जणांसोबत वाद झाले होते. याच वादातून भूषणने काही दिवसांपूर्वी आपली बाईक पेटवून दिली होती .
बाईक शेजारील गाडीचे देखील यामध्ये नुकसान झाले होते .या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. या वादामुळे भूषण मानसिक तणावाखाली होता . गुरुवारी सायंकाळच्या सुमारास टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर लोकल गाडीखाली झोकुन देत भूषणने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भूषणच्या मृतदेहाजवळ त्यांना सुसाईड नोट आढळली. या सुसाईड नोटमध्ये भूषण इमारतीमधील चार जणांनी मानसिक त्रास दिल्याने आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते. भूषणच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार कल्याण रेल्वे पोलीसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत.