अनिकेत घमंडी, डोंबिवली: कल्याण शीळ रस्त्यावरील तळोजा - कल्याण मेट्रोच्या रात्रभर चाललेल्या कामामुळे आणि त्यांनी रस्त्यात मधोमध खांब टाकण्यासाठी खोदाई साठी आणलेली अवाढव्य मशीनचा मोठ्या कर्कश आवाजाने सदर रस्त्यांच्या बाजूला असणाऱ्या निवासी वस्तीला येणाऱ्या आवाजाने रहिवाशी त्रस्त झाले असून सदर काम रात्रभर करू नये अशी मागणी एमआयडीसीमधील नागरिकांकडून होत आहे.
कल्याण शीळ रस्त्यावर विको नाका ते सोनारपाडा/डोंबिवली नागरी सहकारी बँक पर्यंत मेट्रोचे काम सद्या जोरात चालू आहे. नुकतेच या रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले होते. परंतु आता मेट्रो कामामुळे या रस्त्यावरील दुभाजक आणि त्यामध्ये लावलेली झाडे, पथदिवे हे काढून टाकण्यात आली आहेत. जर मेट्रोचे काम नियोजित होते तर हा रस्त्यावरील खर्च करायला नको पाहिजे होता. त्यामुळे करोडो रुपयांचा चुराडा झालाच आहेच शिवाय दुभाजकामध्ये लावलेली पूर्ण वाढ झालेली झाडे तोडण्यात येऊन फेकून देण्यात आली आहेत. नवीन लावण्यात आलेले दुभाजक रस्त्यांच्या बाजूला फेकण्यात आले आहेत. शिवाय या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी येथे होत असल्याचे रहिवासी राजू नलावडे म्हणाले. कल्याण तळोजा मेट्रो ही डोंबिवली शहराबाहेरून जात असल्याने तिचा डोंबिवलीकरांना काहीही फायदा होणार नाही आहे. रेल्वेला पर्याय म्हणून डोंबिवलीकरांसाठी ठाणे, नवी मुंबई येथे जाण्यासाठी मेट्रो होणे आवश्यक होते. आता तर या कल्याण शीळ रस्त्यावर या कामामुळे कमीत कमी दोन वर्ष वाहतूक कोंडीचा सामना लोकांना करावा लागणार असल्याने डोंबिवलीकरांच्या त्रासात आणखी भर पडणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मेट्रोचे काम करणारे एमएमआरडीए आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांना आवाहन करण्यात येते की, मेट्रोचे रात्रभर होणारे कर्कश आवाजाचे हे काम बंद करावे. शिवाय यातील तोडलेली झाडे ही पुन्हा योग्य जागी पूनरोपण Transplant करून लावावीत. अर्थात ही फेकलेली झाडे आता जिवंत राहिली आहेत का प्रश्न आहे ? कर्कश आवाज आणि झाडे तोडीमुळे होणारे प्रदुषण रोखावे त्यात आज जागतिक पर्यावरण दीन असल्याने याचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी रहिवाशांनी केली.