डोंबिवली : शहरात साचणारा कचरा शून्य कचरा मोहिमेंतर्गत दररोज उचलला जात असल्याचा दावा केडीएमसीच्या वतीने केला जात आहे. मात्र, पश्चिमेकडील रेल्वेच्या हद्दीतील बावनचाळ परिसर पाहता तो फोल ठरत आहे. या परिसरात कचऱ्याबरोबरच आता मोठ्या प्रमाणावर डेब्रिज व घरगुती कचराही टाकला जात आहे. त्यामुळे एकेकाळी या परिसराला असलेले वैभवही लोपले आहे.
पश्चिमेतील बावनचाळ ही रेल्वेची वसाहत आहे. ठाकुर्लीतील चोळा पॉवर हाऊस असताना या परिसराला एक वैभव होते. झाडीझुडपांमुळे येथील हवाही स्वच्छ होती. त्या काळी सकाळी-सायंकाळी डोंबिवलीतील नागरिक या परिसरात फेरफटका मारायला येत असत. मात्र, कालांतराने आता तेथील बहुतांश घरे ओस पडली आहेत. त्यामुळे हा परिसर ओस पडल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे या परिसरात सध्या कचरा, फर्निचर व डेब्रिज टाकले जात आहे.
शहरातील नागरिक व विकासकांमार्फत करण्यात येणारे बांधकाम व दुरुस्तीच्या कामांमधून मोठ्या प्रमाणात डेब्रिज निर्माण होते. बऱ्याच वेळा त्याची विल्हेवाट लावली जात नसल्याने धूळ निर्माण होते. परिणामी आरोग्याला निर्माण होणारा धोका पाहता तत्कालीन महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या पुढाकाराने त्यांच्या कार्यकाळात जून २०१६ ला पर्यावरण दिनाचे औचित्य साधत केडीएमसीने डेब्रिजमुक्त रस्ते व पदपथ अभियान सुरू केले होते. यासाठी कॉल ऑन डेब्रिज ही सुविधा चालू केली होती. त्याचे नियोजन मनपाच्या बांधकाम विभागाकडे होते. परंतु, कालांतराने हे अभियान फारसे चालले नाही. सध्या सर्रासपणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला डेब्रिज टाकले जात असल्याचे चित्र बावनचाळीत पहायला मिळते. या भागामध्ये फारशी वर्दळ नसल्याने रात्रीच्या सुमारास याठिकाणी बिनदिक्कतपणे डेब्रिज टाकले जात आहे.
कचरा जाळण्याचे प्रकार
- डेब्रिजबरोबर कचऱ्याचेही ढिगारे दिसत आहेत. घरातील टाकाऊ वस्तू, फर्निचर, गाद्या याचबरोबर फेरीवाले, मांस विक्रेते त्यांचा कचरा येथे टाकतात. त्यामुळे कचऱ्याला दुर्गंधी येते. अनेकदा हा कचरा जाळला जातो.
- हत्या केल्यानंतर एक मृतदेहही काही वर्षांपूर्वी येथील कचऱ्यात टाकण्यात आला होता. त्यामुळे येथील सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. एकूणच या परिसराला अवकळा आली आहे.