- मुरलीधर भवार
कल्याण - कोकण रेल्वे मार्गावरुन गणेशोत्सव काळात १५ दिवसाकरीता मालगाड्यांची वाहतूक बंद करण्यात यावी. या मालगाड्यांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात यावी. या मार्गावर गणेशोत्सवाकरीता अप डाऊन किमान १०० फेऱ्या सोडल्या जाव्यात अशी मागणी उद्धव सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
कल्याण लोकसभेतून उद्धव सेनेच्या शिष्ट मंडळाने कोकण रेल्वेच्या अधिकाऱ््यांची भेट घेतली. कल्याण जिल्हा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत, जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, महिला जिल्हा संघटक वैशाली दरेकर - राणे यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे मुख्य परिचालन प्रबंधक व्ही. सी. सिन्हा यांची भेट घेतली. यावेळी उप जिल्हाप्रमुख विजय देसाई, विभागप्रमुख वैभव शिरोडकरआदी उपस्थित होते.
दरवर्षी गणेशोत्सवाकरिता १ ते १८ सप्टेंबर दरम्यान कोकण रेल्वेने मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गे गणपती उत्सव विशेष गाड्या सोडल्या जातात. यंदाही गाड्या साेडल्या जाणार आहेत. त्याचे प्रवासी आरक्षण फुल्ल झाल्या प्रत्येक गाडीला वेटिंग लिस्ट आहे. कोकण रेल्वे मार्गावर उत्सव कालावधीत अजुन जादा गाड्या सोडता येत नाहीत. हे कारण रेल्वेकडून नेहमी सांगितले जाते. कारण ट्रॅक व्यस्त असल्याने आणि क्षमता संपल्याने आणखी अतिरिक्त गाड्या सोडता येत नाहीत. उद्धव सेनेच्या मते प्रत्येक दिवशी ६ ते ७ मालगाड्या सोडल्या जातात. उत्सव काळातील १५ दिवसांमध्ये मालगाड्या पूर्णतः बंद करुन त्यांची वाहतूक पर्यायी दुसऱ्या मार्गाने वळवून त्या जागी किमान अप डाऊन १०० फेऱ्या सोडल्या जाऊ शकतात.
कोकण रेल्वे मार्गाने दक्षिण भारतात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या अती जलद गाड्या उत्सव काळात कोकण मार्ग वगळून पूर्वीच्या मार्गाने वळविण्यात याव्यात. म्हणजे त्या जागी काही नव्या गाड्या सोडल्या जाऊ शकतात. कुडाळ आणि सावंतवाडी या दरम्यान झाराप हे रेल्वे स्टेशन आहे. गणेशोत्सव काळात काही गाड्यांना या स्टेशनवर थांबा देण्यात यावा. कारण हे स्टेशन वेंगुर्ला तालुका सावंतवाडी , कुडाळ तालुक्यातील माणगाव खोरे येथील सुमारे १०० गावांना सोयीचे मध्यवर्ती ठिकाण आहे. काही गाड्यांना दिवा जंक्शन येथे थांबा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. शिष्टमंडळाच्या आग्रही मागणी नुसार अजून अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचे आश्वासन दिले.