कल्याण - शहरातील रस्त्यावर धूळ आहे. खड्डे बुजविले गेले नाही. तसेच शहरात कचरा उचलला जात नसल्याने अस्वच्छता आहे. या समस्या दूर करण्याकडे कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे. या समस्यांनी त्रस्त असेलल्या सेक्रेट हार्ट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी महापालिकेच्या ब प्रभाग कार्यालयावर धडक दिली. प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध व्यक्त करीत प्रभाग कार्यालय परिसरात स्वच्छता करण्यात आली. यावेळी शाळेच्या या आंदोलनास सामाजिक संस्थांनीही पाठिंबा देत सहभाग घेतला.
सेक्रेट हार्ट हायस्कूलचे प्रमुख अ’ल्बीन अँथोनी यांनी सांगितले की, कल्याण खडकपाडा परिसर हा सगळ्यात जास्त प्रदूषित ठिकाण आहे. २०२२ साली प्रदूषण अहवालात ते नमूद करण्यात आले आहे. ढाका, रंगून, कराची पेक्षा कल्याण डाेंबिवलीची स्थिती खराब आहे. स्मार्ट सिटी प्रकल्प राबविला जात आहे. मात्र रस्त्यावरची धूळ दूर काेण करणार. खड्डे कोण भरणार याचे उत्तर महापालिका प्रशासनाकडे नाही. महापालिका अधिकारी वर्गास वारंवार पत्र व्यवहार केला जातो. त्यांच्याकडून हद्दीचा प्रश्न उपस्थित केला जातो. नागरीकांना श्वसनाचे अनेक आजार होत आहेत. विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. अधिकाऱ््यांच्या निष्काळजीपणाच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. कारण आयुक्तांना आम्हाला भेटण्यासाठी वेळ नाही.
या आंदोलनास जागरुक नागरीक फाऊंडेशनचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर यांनी सक्रिय पाठिंबा दिला. घाणेकर यांनी सांगितले की, शहरात घनकचऱ््याचा प्रश्न आहे. स्वच्छता केली जात नाही. कचरा उचलला जात नाही. रस्त्यावरील धूळीचा नागरीकांना त्रास आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले नाही. ५ तारखेला केलेल्या पत्र व्यवहाराची दखल आज घेतली जात आहे. याचाल गतीमान प्रशासन म्हणायचे का असा सवाल आहे. धूळ स्वच्छतेकरीता महापालिकेने टेंडर काढले आहे. कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. प्रत्यक्षात काम कुठे आहे हा खरा प्रश्न आहे. यासंदर्भात सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी सांगितले की, पावसाळ्यात खड्डे बुजविता आले नाही. त्यामुळे आत्ता खड्डे बुजविण्याचे काम सुरु आहे. कचरा उचलण्याची काम सुरु आहे. तसेच महापालिकेने नुकतीच दोन धूळ शमन यंत्रे घेतली आहे. त्याद्वारे धूळ शमन केले जाणार आहे. आज झालेल्या आंदोलना संदर्भात आयुक्तांनी ३१ तारखेला बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत या मुद्यावर पुन्हा चर्चा होऊन ज्या काही समस्या आहेत. त्या दूर केल्या जातील.