बदलापूर: मान्सूनपूर्व पावसाची शक्यता अंबरनाथ तालुक्यात वर्तवण्यात येत असतानाच रविवारी दुपारी अचानक सुसाटच्या वाऱ्यासह धुळीचे वादळ सर्वत्र पसरले होते. वारा आणि धूळ मोठ्या प्रमाणात परिसरात आल्याने नागरिकांना त्याचा त्रास जाणवला. बदलापूर- वांगणी दरम्यान याचा प्रभाव सर्वा जास्त दिसून आला. आज सकाळपासूनच अंबरनाथ तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता निर्माण झाली होती.
दुपारी तीन वाजताच्या दरम्यान अचानक सुसाट्याच्या वाऱ्यासह धुळीचे वादळ आल्याने नागरिकांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सर्वत्र धूळ पसरल्याने दृश्यमानता देखील कमी झाली होती. बदलापूर वांगणी राज्य महामार्ग हा पूर्णपणे धुळीच्या विळख्यात सापडला होता. त्यामुळे वाहन चालकांना देखील वाहनांचा वेग मंद करावा लागला. तब्बल अर्धा तासाहून अधिक काळ हे वादळ ग्रामीण भागात तळ ठोकून होते. अचानक मोठ्या प्रमाणात धूळ हवेत मिसळल्याने सर्वच नागरिकांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सोबतच वारा देखील मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र पाऊस न पडता या धुळीच्या वादळाने अर्धा तास नागरिकांना हैराण करून सोडले