कल्याण: स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत दाखल होणा-या ई-बसची प्रतीक्षा अखेर संपली आहे. या युरो बस केडीएमटीच्या उपक्रमात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. आज काही बस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे नादुरूस्त, ब्रेक डाऊन बसमधून होणारा प्रवास लवकरच थांबणार असून कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यावर ई-बस मधून आरामदायी प्रवास अनुभवता येणार आहे. साधारण दिवाळीपुर्वीच या बस प्रत्यक्ष सेवेत दाखल व्हाव्यात अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पंधराव्या वित्त आयोगातून आलेल्या निधीतून २०७ ई-बस भाडेतत्वावर चालविल्या जाणार आहेत. राज्य सरकारने १०० कोटींचा निधी कल्याण डोंबिवली महापालिकेस उपलब्ध करून दिला आहे. उपक्रमात दाखल झालेल्या युरो बसचे कंत्राट कॉसिस मोबिलिटी आणि बुथेलो कंपनीला दिले आहे. पहिल्या टप्प्यात कॉसिस मोबिलिटी १०७ बस पुरविणार आहे, तर दुस-या टप्प्यात बुथेला कंपनीला १०० बस पुरविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान या बस कल्याण डोंबिवलीत कधी धावतील, ही प्रतीक्षा लागून राहिली होती. ही प्रतीक्षा आता संपली आहे.
प्रदूषणमुक्त आरामदायी प्रवासनव्याने दाखल झालेल्या युरो बसमुळे एकीकडे प्रदुषणमुक्त आणि आरामदायी प्रवासाचा आनंद प्रवाशांना मिळणार आहे. तर दुसरीकडे आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या उपक्रमालाही ई-बसमुळे आधार मिळणार आहे.
सदयस्थितीला मुक्काम वसंत व्हॅली आगारातचआज सकाळी केडीएमटीच्या वसंत व्हॅली आगारात एक ई-बस दाखल झाली. रात्रीपर्यंत आणखी चार बस दाखल होतील अशी माहीती उपक्रमाचे महाव्यवस्थापक डॉ दीपक सावंत यांनी दिली. डोंबिवलीतील खंबाळपाडा आगारात या ई-बस ठेवण्यात येणार आहेत परंतू सदयस्थितीला या ई-बस तुर्तास वसंत व्हॅली आगारातच ठेवल्या जाणार आहेत. त्याचठिकाणी चार्जींग स्टेशन उभारण्यात येणार आहे असे सावंत यांनी सांगितले.