लोकमत न्यूज नेटवर्क, बदलापूर: गेल्या दोन वर्षांत आमच्या सरकारने लोकांच्या हितासाठी अनेक कामे केली. पूर्वीचे सरकार हे हप्ता घेणारे सरकार होते आणि आमचे सरकार हे महिला, शेतकरी आणि बेरोजगार यांच्या बँक खात्यात हप्ता भरणारे सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी व्यक्त केले. बदलापूर नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
अंबरनाथ आणि बदलापूर ही दोन्ही शहरे जलदगतीने वाढत आहेत. या दोन्ही शहरांची एकत्रित पालिका करण्याबाबत विचार व्हावा, अशी मागणी बदलापूरचे शिंदेसेनेचे शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. आपण पुन्हा एकदा विचार करून योग्य तो निर्णय कळवल्यास अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांची एकत्रित पालिका करायला हरकत नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
एक रुपयाचेही राजकारण करतील...
- आमचे सरकार फसवे नसून, लोकांसाठी काम करणारे आहे. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असून, महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी गेल्या दोन वर्षांत अनेक प्रकल्प राबवले आहेत.
- लाडकी बहीण योजनेचा हप्ता भरताना महिलांचे बँक अकाउंट लिंक झालेत की नाही, हे चेक करण्यासाठी सरकार सुरुवातीला एक रुपया टाकणार होते, मात्र विरोधक या एक रुपयाचेही राजकारण करतील, म्हणून आम्ही पूर्ण रक्कम आमच्या भगिनींच्या बँक खात्यात टाकल्याचे शिंदे यांनी सांगितले.
- विरोधकांना प्रत्येक योजनेमध्ये केवळ राजकारण दिसत असून, आम्ही जनतेच्या समाधानासाठी काम करत असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, आमदार किसन कथोरे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ज्ञानेश्वर म्हात्रे, खासदार सुरेश म्हात्रे यांच्यासह सर्व नगरसेवक आणि राजकीय पुढारी उपस्थित होते.