डोंबिवली: 29 ते 31 जानेवारी या कालावधीत झालेल्या 28 व्या राष्ट्रीय बालवैज्ञानिक परिषदेच्या राज्यस्तरीय फेरीत डोंबिवलीच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर या शाळेचा विद्यार्थी नंदन सचिन कार्ले हा पुढील फेरीसाठी निवडला गेला आहे.
यात त्याने सादर केलेला इकोफ्रेंडली डिटर्जंट हा प्रकल्प अव्वल ठरला आहे. यावेळेस ही परिषद आभासी पद्धतीने घेतली गेली. पहिल्या फेरीत सिनोप्सिस पाठवून प्रकल्पाची निवड केली गेली. नंतर जिल्हा पातळीवर 2 फेऱ्या घेतल्या गेल्या. त्यात ठाणे जिल्ह्यातील 268 बालवैज्ञानिकांनी आपले प्रकल्प व्हिडिओ सादरीकरण तसेच समाज माध्यमांवरील मीटिंग च्या माध्यमातून मांडले. त्यातील केवळ 18 बालवैज्ञानिकांचे प्रकल्प राज्यस्तरीय फेरीसाठी निवडले गेले.
नंतर राज्यस्तरीय फेरीत 22 जिल्ह्यातील 116 संशोधन प्रकल्प सादर झाले. त्यापैकी उत्कृष्ट 30 प्रकल्प यापुढील राष्ट्रीय फेरीकरिता निवडले गेले आहेत. त्यापैकी नंदन कार्लेचा 'इकोफ्रेंडली डिटर्जंट' हा प्रकल्प परीक्षकांच्या प्रशंसेस पात्र ठरला आहे.
त्याचप्रमाणे नंदनचा दुसरा एक प्रकल्प लो कॉस्ट वॉटर प्युटीफायर हा इंस्पायर मानक (Innovation in Science Pursuit for Inspired Research) या भारत सरकारच्या विज्ञान विभागाच्या उपक्रमाच्या जिल्हास्तरीय फेरीकरिता पात्र ठरला आहे. या स्पर्धेसाठी देशभरातून विद्यार्थी आपल्या त्यांना सुचलेल्या कल्पना/युक्त्या पाठवतात. त्यापैकी सुमारे 100000 भन्नाट कल्पना ज्या समाजोपयोगी, पर्यावरणपूरक आणि किफायतशीर असतील त्या जिल्ह्यास्तरावरील प्रदर्शनासाठी निवडल्या जातात. तिथे विद्यार्थ्यांनी तयार करून सादर करायचा असतो.
त्यात नंदनने मुख्यत्वे आदिवासी लोकांसाठी किंवा अगदी दुर्गम भागात पोस्टिंग असणाऱ्या सैनिकांसाठी घरच्या घरी तयार करता येणाऱ्या लो कॉस्ट वॉटर प्युरीफायर' ही संकल्पना मांडली. यासाठी त्याची महाराष्ट्रातून निवडलेल्या 3139 प्रकल्पात निवड झाली आहे. या दोन्ही प्रकल्पासाठी त्याला शाळेच्या विज्ञान शिक्षिका जयश्री दौंड, मुख्याध्यापिका सुलभा बोन्डे, पर्यवेक्षिका विद्या कुलकर्णी तसेच त्याची आई नीलिमा कार्ले यांचे मार्गदर्शन मिळाले.
लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन शाळा, अभ्यास सांभाळून नंदनने या प्रकल्पांवर काम केले आहे.आणि करत आहे. लॉकडाऊनमध्ये त्याने हरबल सॅनिटायझर, बायोइंझिम तसेच साबणही तयार केले. नंदनने याआधीही विविध विज्ञान प्रदर्शने, होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा तसेच काव्यलेखन स्पर्धेत यश मिळवले आहे.