सचिन सागरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: शारदा मंदिर हायस्कूल, कल्याण या शाळेत गुरुवारी प्रदूषण मुक्त होळी साजरी करून एक नवीन आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवला. सुमारे साडेसहाशे विद्यार्थी या कार्यक्रमात उपस्थित होते. मुख्याध्यापक आर. डी. पाटील यांच्या संकल्पनेतून नैसर्गिक रंगांची व निसर्गाचा एक चांगला संदेश देणारी होळी साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंग बनवून नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी काही घोषवाक्य तयार केली होती. विद्यार्थ्यांना ऋतुमानाबद्दल व होळीच्या सणाबद्दल मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी, विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंग व पाण्याचा अपव्यय टाळणे हा संदेश देणारी प्रतिज्ञा देण्यात आली. होली पूजन करून विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अत्यंत आनंदाने नैसर्गिक रंगांचा वापर करून होळी साजरी केली. यावेळी पर्यवेक्षिका वैशाली देशमुख, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. पालकांनी देखील यात सहभाग घेतला होता.