अनिकेत घमंडी, डोंबिवली: एमआयडीसी निवासी भागात शिवप्रतिमा सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे यावर्षी होळी पौर्णिमा ही गाईचे शेणापासून बनविलेल्या लाकडापासून म्हणजेच गोकाष्ट याची पर्यावरण पूरक प्रदूषण मुक्त होळी साजरी करण्यात आली. एमआयडीसी मध्ये रासायनिक आणि इतर प्रदूषण मोठ्या प्रमाणात असल्याने वृक्षांवर आघात न करता आणि त्यात लाकूड जाळून प्रदूषणाची आणखी भर न घालता जर अशा प्रकारे होळीचा सण साजरा केल्यास एक चांगला संदेश/पर्याय आपण जनतेसमोर देऊ शकतो असे शिवप्रतिमा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पदाधिकारी आणि सभासद कार्यकर्त्यांना वाटल्याने त्यांनी हा पर्यावरणपूरक प्रदूषण मुक्त होळीचा निर्णय घेतला होता.
या होळीत गोकाष्ट लाकडाबरोबर परिसरात पडलेला झाडांचा पालापाचोळा, नारळाच्या झाडाच्या झावळ्या इत्यादी गोळा करून त्याची होळी बांधून भडजी करवी एक जोडप्याकडून विधिवत पूजा करून होळी पेटविण्यात आली. यावेळी देवाकडे वाईट शक्तीचा नाश होण्यापासून ही नगरी प्रदूषण मुक्त होऊदे आणि सर्वांना सुख समृद्धी लाभू दे असे ग्राहाणे घालण्यात आले. या प्रसंगी निवासी परिसरातील अंदाजे पाचशे नागरिक उपस्थित होते. सदर होळीचा कार्यक्रम निवासी भागातील कै. अशोक कदम मार्गावरील श्रेयस सोसायटी ( RH १५४/१ ) जवळ, रविवारी रात्री ९.०० वाजता संपन्न झाला. सदर या पर्यावरणीय प्रदूषण मुक्त होळीसाठी सागर पाटील, मंदार स्वर्गे, भालचंद्र म्हात्रे यांनी विशेष मेहनत घेतली.