अनिकेत घमंडी/डोंबिवलीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गट समर्थकांमधून विस्तव जात नसल्याचे दृश्य डोंबिवलीत गुरुवारी दिसून आले, बुधवारी दिवाळी होताच शिंदे गटाने येथील मध्यवर्ती शिवसेना शाखेचा सकाळीच ताबा घेतला. त्यामुळे अल्पवधीतच राजकीय वातावरण तंग झाल्याने शहरात या घटनेची प्रचंड चर्चा सुरू होती.
दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी ही राजकीय घडामोड अतिशय वेगाने झाली. मध्यवर्तीवर सकाळीच शिंदे गटाचे शहरप्रमुख राजेश मोरे, ज्येष्ठ माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, दीपेश म्हात्रे, राजेश।कदम, विश्वनाथ राणे, महेश पाटील आदींसह अन्य कार्यकर्ते, पदाधिकारी आल्याने राजकीय घडामोड होणार हे स्पष्ट झाले होते, त्या पाठोपाठ शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हा महिला संघटक कविता गावंड, शहरप्रमुख विवेक खामकर हे मध्यवर्ती शाखेत आले, शाखा ही शिवसेनेची असून तिला ताब्यात घेता येणार नाही असे गावंड यांनी सांगितले, तसेच खामकर यांनीही ठाकरेंनी जबाबदारी दिली असून ती।पार पाडणे हे प्रमुख असल्याने जे काही विषय आहेत ते चर्चेने सोडवावे, दादागिरी भाईगिरी कोणी करू नये असे म्हणाले.
त्यावर शाखेची जागा ही ज्याची आहे त्यासंदर्भात कागदपत्रे आले असून ते बघावे आणि पुढे जावे कोणी वाद घालू नये अशी भूमिका शिंदे गटाच्या समर्थकांनी घेतली. काही वेळाने जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ तेथे आले, त्यांनी शिंदे गटाच्या नेत्यांशी चर्चा केली.दरम्यान पोलिसांना देखील याबाबत माहिती नसल्याने शाखेबाहेर आधी शिंदे गटाचे समर्थक आणि उध्दव ठाकरे समर्थकांनी गर्दी।केली होती, त्यानंतर काही वेळाने पोलिसांनी शाखेबाहेर ताबा घेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेत पोलीस तैनात केले.मध्यवर्ती शाखेतच खासदार श्रीकांत शिंदे यांचे जनसंपर्क कार्यालय असून त्या कार्यालयाला।काही दिवसांपासून टाळे लावले होते, दोन महिन्यांपूर्वी देखील असा तणाव झाला होता, त्यावेळीही चर्चेअंती काही भाग उद्धव ठाकरे गट तर काही भाग हा शिंदे गटाकडे असावा असे सांगण्यात आले होते, मात्र त्यानंतर गुरुवारी दिवाळी होताच वेगाने घडलेल्या घडामोडीने शिंदे गटाने शहर शाखेचा ताबा घेतल्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली. दिवसभरात आणखी राजकीय वातावरण तापण्याची एकंदर चिन्ह दिसून येत आहेत.