कल्याण: लोकसभा निवडणुकीसाठी कल्याणडोंबिवली महापालिकेचे तब्बल अडीच हजार कर्मचारी आणि अधिकारी यांना तैनात करण्यात आले असताना फेरीवाला अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचा-यांनाही निवडणुकीच्या कामाला जुंपले गेले आहे. आचारसंहिता लागल्यावर राजकीय पक्षांचे फलक, झेंडे काढण्याच्या कामात पथक व्यस्त झाल्याने फेरीवाला अतिक्रमण विरोधी कारवाईवर याचा परिणाम झाला आहे. कारवाई थंडावल्याने फेरीवाल्यांचे चांगलेच फावल्याचे चित्र कल्याण डोंबिवलीत पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली. तेव्हापासून फेरीवाला अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचारी बॅनर, होर्डिंग्ज आणि झेंडे काढण्याच्या कामाला लागले आहेत. दहा प्रभागांमधील पथकातील कर्मचा-यांना ही कामे देण्यात आली असून सुमारे शेकडोहून अधिक कर्मचारी या कामात व्यस्त झाले आहेत. रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतरापर्यंत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. परंतू या मनाई केलेल्या हद्दीतील पदपथांवर व रस्त्यालगत मंगळवारी फेरीवाल्यांनी पथारी पसारल्याने पादचा-यांना चालणे जिकरीचे होऊन बसले आहे. शनिवारपासूनच हे चित्र आहे.
कल्याणचा स्कायवॉक फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास आंदण म्हणून दिला गेला असताना डोंबिवलीच्या स्कायवॉकवरही संध्याकाळच्या सुमारास फेरीवाले आणि भाजीविक्रेत्यांचा मोठा बाजार भरत आहे. येथील पथकामधील कर्मचा-यांचा राजाश्रय मिळत असल्याने ही परिस्थिती निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीपासून उदभवल्याचे बोलले जात आहे. दरम्यान कल्याण डोंबिवलीतील एकूणच चित्र पाहता कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने कारवाई करायची तरी कशी? असा सवाल पथकप्रमुख आणि कर्मचा-यांकडून केला जात आहे.