अनिकेत घमंडी, डोंबिवली: सुट्टीच्या दिवशी ग्राहकांना वीजबिलाचा भरणा अधिक सुलभ व्हावा, यासाठी सोमवारी कल्याण परिमंडलातील महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत. या उपलब्ध सुविधेसह डिजिटल माध्यमातून ग्राहकांनी आपल्या चालू व थकीत वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करून अखंडित वीजसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
ग्राहकांच्या सोयीसाठी वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्यासोबतच थकीत वीजबिल वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार आहे. अधिकृत वीजबिल भरणा केंद्राशिवाय महावितरणच्या मोबाईल ॲपवर वीजबिल भरणा तसेच इतर सर्व सुविधा हाताच्या बोटावर उपलब्ध आहेत. www.mahadiscom.in या संकेतस्थळावर केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आदींच्या माध्यमातून वीजबिल ऑनलाईन भरून सवलत मिळवता येते. याशिवाय बाजारात उपलब्ध असलेल्या विविध पेमेंट वॉलेटचा (फोन पे, गूगल पे) उपयोग करून घरबसल्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा आहे. तसेच वीजबिलावर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट पेमेंट गेटवेवर जाऊन वीजबिल भरणे सुलभ होते. अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकित वीजबिलाचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.