कल्याण : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षातील आपल्या गटाच्या संघटनात्मक बांधणीला सुरूवात केली असून कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्षपदाची धूरा जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे यांच्यावर सोपवली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यावतीने नुकतेच शिंदे यांना याबाबतचे नियुक्तीपत्र देण्यात आले असून लवकरच शिंदे यांच्यावतीने कल्याण डोंबिवली जिल्हा नवीन कार्यकारीणी घोषित केली जाणार आहे.
माजी आमदार तथा राष्ट्रवादी पक्षाचे जूने कार्यकर्ते आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आप्पा शिंदे हे अजित पवार गटात आहेत. राष्ट्रवादी पक्ष फुटीच्या आधी देखील शिंदे यांच्याकडे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. त्यावेळी पक्षाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम शिंदेंनी हाती घेतले होते. तसेच कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौकात पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय सुरू केले. शहरातील बीएसयुपीची घर, उल्हास नदी प्रदूषणाचा विषय, रस्ते विकास या विषयी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. शिंदे यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या कार्यकाळात कल्याण डोंबिवलीमधील राष्ट्रवादीला उभारी आली असताना प्रकृती ठिक नसल्याचे कारण देत त्यांनी २० फेब्रुवारीला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. अनेकजण जिल्हाध्यक्ष पदासाठी शर्यतीत होते परंतू शिंदे यांचा राजीनामा वरीष्ठ पातळीवर मंजूर करण्यात आला नाही. दरम्यान राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर शिंदे हे अजित पवार गटात सहभागी झाले होते. त्यांच्यावर आता पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली गेली आहे. शिंदेच्या नियुक्तीने अजित पवार गटाला अच्छे दिनविधानपरिषदेचे आमदार राहीलेल्या शिंदे यांचे सामाजिक काम मोठे आहे. ते महाराष्ट्र केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत. याआधी देखील त्यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. आता पुन्हा एकदा जिल्हाध्यक्षपदी अजित पवार गटाकडून नियुक्ती झाल्याने या गटाला अच्छे दिन आल्याची चर्चा कल्याण डोंबिवलीत आहे.
३१ ऑगस्टला विशेष बैठकआप्पा शिंदे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर ३१ ऑगस्टला कल्याण डोंबिवली स्तरावर विशेष बैठक कल्याणमध्ये पार पडणार आहे. त्यावेळी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्याच पुढाकाराने नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.