डोंबिवली: एलटीटी महू एक्स्प्रेस या गाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने ती गाडी ठाकुर्ली स्थानकात सोमवारी दुपारी पावणे तीन वाजल्यापासून उभी होती. त्यामुळे सोमवारी दिवसभरात सलग दुसऱ्यांदा मध्य रेल्वे ठाकुर्ली कल्याण मार्गावर खोळंबल्याने प्रवाशांचे हाल झाले. इंजिन पुढे न गेल्याने बिघाड झाल्याचे निदर्शनास आले, आणि गाडी जागीच थांबली, त्यामुळे जलद डाऊनचा मार्ग दिवा ते कल्याण दरम्यान ठप्प झाला होता.
त्यामुळेही रेल्वेचे संध्याकाळचे लांबपल्याच्या गाड्यांसह लोकलचे वेळापत्रक सपशेल कोलमडले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत बिघाड दुरुस्ती झाली नसल्याने त्या मागे त्याच ट्रॅकवरून येणाऱ्या लोकल, लांबपल्याच्या गाड्या डोंबिवली, दिवा, ठाणे मार्गावर उभ्या होत्या. त्याचा परिणाम धीम्या मार्गावरील वाहतुकीवरही झाला.
पावसाळ्यात अशा घटना वारंवार घडत असल्याने पूर्वीचे डिझेल इंजिन बरे होते का अशी नाराजीची चर्चा सुरू होती. इंजिनात नेमका बिघाड कशामुळे होतो, कारणे काय असतात हे मात्र रेल्वे प्रशासन कधीही जाहीर करत नाही, त्यामुळे बिघडाचे सत्र सुरू असते, त्याचा रेल्वेला फरक पडत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया जनमानसातून व्यक्त झाली.