कल्याण : अभियांत्रिकी क्षेत्राचे जनक भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिन म्हणजेच १५ सप्टेंबर हा दिवस ‘अभियंता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त सोशल मिडीयावरून जगभरातील सर्वच क्षेत्रातील अभियंत्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. मात्र, केडीएमसीतील सर्वच क्षेत्रातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने जागतिक अभियंता दिनाचे औचित्य साधून रस्ते बनविणाऱ्या अभियंत्यांना सोशल मिडीयावर चांगलेच धारेवर धरण्यात आले आहे.
‘कल्याणचे रस्ते बनविणाऱ्या इंजिनिअर्सला सोडून इतर सगळ्या इंजिनीअर्सना ‘इंजिनीअर्स डे’ च्या हार्दिक शुभेच्छा’ अशा पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या आहेत. कल्याण आणि डोंबिवलीतील सर्वच रस्त्यांवर सध्या खड्डे पडले आहेत. शहरातील खड्ड्यांचा आणि रोजच्या वाहतूक कोंडीचा सामना कल्याण डोंबिवलीकरांना करावा लागत आहे. त्यामुळेच, कल्याणकरांनी जागतिक अभियंता दिनाचे औचित्य साधून येथील खड्डेमय रस्ते बनविणाऱ्या अभियंत्यांना सोडून इतर सर्व अभियंत्यांना जागतिक अभियंता दिनाच्या सोशल मिडीयावर शुभेच्छा दिल्या आहेत.