कल्याण : पंधराव्या वित्त आयोगाच्या एन कॅप फंडिंगमधून राज्य सरकारने १०० कोटी रुपयांचा निधी कल्याण डोंबिवली महापालिकेस उपलब्ध करुन दिला आहे. त्यापैकी ८० टक्के निधी हा बसेसवर खर्च करणे बंधनकारक आहे. या निधीतून वेटलिज तत्वावर दोन टप्प्यात एकूण २०७ बसेस महापालिकेच्या परिवहन उपक्रमास उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १०७ बसेस उपलब्ध होती. दुसऱ्या टप्प्यात १०० बसेस उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.
युरोपच्या युरोबसेस दिल्या जाणार असून या बसेस उपलब्ध करुन देण्याचे कंत्राट कॉसिस मोबिलिटी आणि बुथेलो कंपनीला दिले गेले आहे. नोव्हेंबर अखेर १२ बसेस केडीएमटीच्या ताफ्यात दाखल होती. कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यावर आत्ता युरो बसेस धावणार आहेत. दिवाळी पूर्वीच केडीएमटीच्या प्रवाशांना ही गोड बातमी देऊन एक प्रकारे दिवाळी भेटच दिली गेली आहे. महापालिकेची केडीएमटी ही आर्थिक दृष्ट्या कमकवूत आहे. त्यामुळे अनेक मार्गावर सेवा देण्याचा मानस असूनही चांगल्या प्रकारच्या सेवा देणो शक्य होत नाही.
केडीएमटीच्या ताफ्यात सध्या १४१ बसेस आहेत. त्यांचे आयुर्मान हे सात वर्षाचे आहे. आणखीन तीन वर्षाने त्यांची क्षमता संपुष्टात येणार आहे. १४१ बसेपैकी केवळ १०० बसेसच रस्त्यावर धावत आहे. उर्वरीत ४१ बसेस या देखभाल दुरुस्तीसाठी कार्यशाळेत आहेत. महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्प राबविला आहे. या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत प्रवाशांना देखील चांगल्या बसेस उपलब्ध करुन देण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहिला आहे. पंधराव्या वित्त आयोगातून आलेल्या निधीतून २०७ बसेस वेट लिज तत्वावर चालविल्या जाणार आहे. या बसेस पुरविण्याचे कंत्राट कॉसिस मोबिलीटी या कंपनीला दिले गेले आहे.
सक्षम प्राधिकरणाने संबंधित कंत्रट कंपनीला स्वीकृती पत्र दिले आहे. पहिल्या टप्प्यात कॉसिस मोबिलीटी १०७ बसेस पुरविणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात बुथेला कंपनीला १०० बसेस पुरविण्याची जबाबदारी दिली गेली आहे. या बसेस कंपनीकडून चालविल्या जाणार आहे. प्रति किलोमीटर मागे संबंधित कंत्राटदार कंपनीला खर्च दिला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना युरोबसमधून प्रवास करता येणार आहे. प्रदूषण मुक्त आणि आरामदायी प्रवास हे केडीएमटीने लक्ष्य ठेवले आहे. २०७ बसेस ताफ्यात दोन टप्प्यात दाखल झाल्यावर प्रवाशांना चांगल्या आरामदायी बसेमधून प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारने निधी उपलब्ध करुन दिल्याने केडीएमसी सक्षम होणार आहे असा विश्वास केडीएमटी व्यवस्थापक डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त करण्यात आला.