अजित मांडके/विशाल हळदे लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : दोन वर्षांपूर्वी अत्याधुनिक स्वरूपात सुरू झालेल्या जवाहरबाग स्मशानभूमीत चार विद्युत दाहिनी आहेत, परंतु जनरेटरची व्यवस्था नसल्याने अंत्यसंस्कारावेळी अचानक वीज गेली, तर वीजपुरवठा पूर्ववत होईपर्यंत मृतांच्या नातलगांना प्रतीक्षा करावी लागते. गुरुवारी एक कुटुंब अंत्यसंस्कारासाठी आले असताना, वीजपुरवठा बंद झाला. तब्बल तासभर त्यांना तिष्ठत राहावे लागले. सुदैव एवढेच की, मृतदेह विद्युत दाहिनीत ठेवल्यावर वीजपुरवठा खंडित झाला नाही, अन्यथा मृत्यूनंतरही मृतदेहाची विटंबना होण्याचा संतापजनक प्रकार अनुभवास आला असता. त्यामुळे जवाहरबाग स्मशानभूमीत जनरेटरची सुविधा लागलीच उपलब्ध करण्याची मागणी होत आहे.
ठाणे शहरातील मध्यवर्ती भागातील जुनी स्मशानभूमी ठाणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेली जवाहरबाग स्मशानभूमी ही सर्वांत जुनी स्मशानभूमी आहे. जुन्या स्मशानभूमीच्या जागेच्या चारपट म्हणजेच तीन हजार चौरस मीटर क्षेत्रफळात नवीन स्मशानभूमी उभारली आहे. येथील उष्णता, धूर शोषून घेण्यासाठी चिमणी बसविली आहे. त्यामुळे आसपासच्या भागाला यापूर्वी होणारा त्रास कमी झाला. सद्य:स्थितीत या ठिकाणी चार विद्युत दाहिनी आणि लाकडावरील अंत्यसंस्काराची पाच अशी व्यवस्था आहे. २०२२ च्या सुमारास नव्याने ही स्मशानभूमी सज्ज झाली. या स्मशानभूमीत रोजच्या रोज १० ते १५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात.
मृतदेह ठेवताच वीज गायबगुरुवारी सायंकाळी एक कुटुंब अंत्यसंस्कारासाठी आले होते. मृतदेह विद्युत दाहिनीत ठेवणार तोच वीजपुरवठा खंडित झाला. मृतदेह दाहिनीत ठेवून दरवाजा बंद केला नव्हता. वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत एक तास गेला. त्यामुळे आलेले कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र परिवार ताटकळले. जनरेटरची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नातलगांनी यावेळी केली. वीजपुरवठा बेभरवशाचा असल्याने महानगर गॅसची वाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले होते. गॅस दाहिनीचा पर्याय उपलब्ध झाला, तरी नातलगांना ताटकळावे लागणार नाही. परंतु, गॅस वाहिनी टाकण्याचे पुढे काय झाले ते येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनासुद्धा माहीत नाही.
धुराचा त्रासधुराचा त्रास होऊ नये, म्हणून विविध उपाययोजना केल्या असल्या, तरी आजही येथील आजूबाजूच्या नागरिकांना लाकडापासून होणाऱ्या धुराचा त्रास सहन करावा लागतो. येथील बहुसंख्य पंखे बंद आहेत. तसेच, याठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली जाणार होती. परंतु, ते काम अर्धवट स्थितीत आहे.