-अनिकेत घमंडी डोंबिवली : ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. आगामी लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभेसाठी रिंगणात उतरण्याची इच्छा असल्याने परांजपे अजितदादांसोबत गेल्याची चर्चा आहे. परांजपे यांनीही याला दुजोरा दिला.
परांजपे यांनी रविवारी अजित पवार यांच्यासमवेतच राहण्याचा निर्धार केला. तत्पूर्वी त्यांनी आव्हाड यांच्याशी चर्चा केली आणि मग निर्णय घेतला., असे सांगण्यात आले. कल्याण लोकसभेसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात केले. मात्र ठाणे लोकसभेसाठी नेमका उमेदवार कोण व तो भाजपचा असेल की शिंदे गटाचा हे स्पष्ट झाले नव्हते. उपमुख्यमंत्री पवार ठाणे लोकसभेची जागा मागू शकतात.
जिव्हाळ्याचे संबंधपरांजपे हे रेल्वेच्या प्रश्नांविषयी अभ्यासू नेते म्हणून ओळळले जातात, ठाण्यात अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीची धुरा त्यांनी सांभाळली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांचे खूप जिव्हाळा, सलोख्याचे संबंध आहेत.
संभाव्य इच्छुकपरांजपे यांनी इच्छा व्यक्त केली असून ठाणे लोकसभा निवडणूक लढवण्याकरिता इच्छुक असलेले भाजपमधील माजी खासदार संजीव नाईक, आमदार संजय केळकर, ज्येष्ठ नेते विनय सहस्त्रबुद्धे हे ठाणे व कल्याण लोकसभेची जागा मित्रपक्षांना सोडून देणे स्वीकारतात का, याबाबत औत्सुक्याचे आहे.
२०२४ मध्ये निवडणूक लढण्याची तीव्र इच्छाआता राजकीय समीकरण बदलले असले तरीही ठाण्यातून उभे राहण्याची इच्छा परांजपे यांनी ठेवली आहे. या आधी त्यांचे वडील प्रकाश परांजपे यांचे निधन झाल्यावर २००९ मध्ये कल्याण लोकसभेची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यात निवडणूक झाली आणि त्यावेळी त्यांनी दिवंगत वसंत डावखरे यांचा पराभव केला होता. जानेवारी २०१२ मध्ये परांजपे यांनी शिवसेनेची ठाण्यातील कार्यपद्धती पटत नसल्याने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. आता पुन्हा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत परांजपे यांना निवडणूक लढवण्याची तीव्र इच्छा असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.
मी इच्छुक आहेच, पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, पण संधी मिळावी अशी माझी प्रामाणिक मागणी आहे.- आनंद परांजपे, माजी खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस.