डोंबिवली: १८ महिन्यांकरीता ठाणे जिल्हयातून हद्दपार केलेल्या गुंडाला शनिवारी डोंबिवली पूर्व भागातून कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली. सागर उर्फ डोळा काशिनाथ दाते असे अटक केलेल्याचे नाव असून तो रेकॉर्डवरील नामचीन गुंड आहे.
गुन्हे अन्वषेण विभागाचे पोलिस हवालदार दत्ताराम भोसले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, हद्दपार केलेला सागर उर्फ डोळा हा धारदार भला मोठा कोयता घेऊन पूर्वेकडील दत्तनगर भागातील प्रगती कॉलेजच्या समोरील गार्डन जवळ उभा आहे. ही मिळालेली माहिती गुन्हे अन्वषेणचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक नरेश पवार यांना भोसले यांच्याकडून देण्यात आली. त्यांनी लागलीच सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष उगलमूगले, पोलिस उपनिरीक्षक संजय माळी, पोलिस हवालदार दत्ताराम भोसले, विश्वास माने, बालाजी शिंदे, मिथुन राठोड, गुरूनाथ जरग आदिंचे पथक गुंड डोळा ला पकडण्यासाठी घटनास्थळी रवाना केले. पोलिस आल्याची चाहूल लागताच डोळा पळायला लागला. पळणा-या डोळा चा पाठलाग करून त्याला त्याच्या हातातील धारदार कोयत्यासह पकडले. त्याला रामनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
रामनगर पोलिस ठाण्यात चार गुन्हे
सागर उर्फ डोळा हा ६ जून २०२३ पासून हद्दपार आहे. त्याच्यावर रामनगर पोलिस ठाण्यात शस्त्राने वार करून दहशत माजविणे असे ३ तर अंमली पदार्थ बाळगणे व विक्री करणे असा १ गुन्हा असे चार गुन्हे दाखल आहेत.