डोंबिवली : येथील ठाकुर्ली परिसरातील कचोरे खाडीच्या परिसरात दोन लहान मुले सोडून आई बेपत्ता झाल्याच्या घटनेला मंगळवारी आठ दिवसांचा कालावधी उलटला, तरी आई रत्नमाला साहु हिचा शोध लागलेला नाही. तिच्या या कृत्यामुळे पोरक्या झालेल्या दोन्ही तान्हुल्यांचा ताबा अखेर मंगळवारी वडिलांना देण्यात आला आहे. तान्हुल्यांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्या काकूने घेतल्याने जननी आशिष या बालसंगोपन केंद्रातून त्यांचा ताबा घेण्यास बाल कल्याण समितीने मान्यता दिली. संध्याकाळी सातच्या दरम्यान वडील आणि काकीने या दोघांना ताब्यात घेत घर गाठले.खाडी किनारी बेवारस स्थितीत आढळलेली दोन्ही लहान मुले जननी आशिष या बालसंगोपन केंद्रात होती. एकिकडे पत्नी रत्नमाला बेपत्ता असताना वडील सुब्रत यांना लहान मुलांचा ताबाही मिळालेला नव्हता. मागील गुरूवारी बाल कल्याण समितीपुढे झालेल्या सुनावणीत घरात मुलांचा सांभाळ करण्यासाठी सक्षम महिला असल्यास मुलांचा ताबा घेऊ शकता असा निर्णय देण्यात आला होता. दरम्यान मंगळवारी झालेल्या सुनावणीत सुब्रत यांनी भावाची पत्नी मुलांचा सांभाळ करण्यासाठी आली आहे, अशी माहीती दिली. सुब्रत यांनी समितीपुढे भावाच्या पत्नीलाही उभे केले होते. अखेर मुले सांभाळण्याची खात्री पटल्यावर समितीने मुलांचा ताबा घेण्यास मान्यता दिली. मान्यता मिळताच सुब्रत आणि त्यांची भावजय यांनी जननी आशिष बालसंगोपन केंद्र गाठत दोन्ही तान्हुल्यांचा ताबा घेतला. दरम्यान आठ दिवस उलटूनही बेपत्ता रत्नमालाचा शोध लागलेला नाही.
अखेर तान्हुल्यांचा वडिलांना मिळाला ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 12:40 AM