कल्याण - कल्याण डोंबिवली नगरी स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सगळयांचेच सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी आज येथे केले. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने अत्रे रंगमंदिरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२३ अंतर्गत आयोजिलेल्या स्वच्छता विषयक विविध स्पर्धेतील विजेत्यांचा, स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महापालिकेस सहकार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा आणि स्वच्छतेच्या कामात चांगली कामगिरी बजाविलेल्या अधिकारी कर्मचारी वर्गाच्या सत्कार आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला.
मी आयुक्त म्हणून रूज होण्यापूर्वी महापालिका हद्दीत कचऱ््याचे ढिग दिसून येत होते. कचरा टाकली जाणारी ठिकाणे कमी करण्यात यश आले आहे. यात बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. महापालिका सध्या कचरा प्रोसेसिंग, लॅण्ड फिलींग करीत आहोत आणि ओल्या कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅसही तयार करणार आहे. कचरा प्रोसेसिंगला पैसे द्यावे लागणार नाहीत, उलट त्यातून महापालिकेला रॉयल्टी मिळेल अशी व्यवस्था केली आहे असेआयुक्तांनी सांगितले. स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचे महापालिकेचे ब्रॅण्ड ॲम्बॅसेडर डॉ. प्रशांत पाटील, डॉ. रुपींदर कौर, रुपाली शाईवाले यांनी प्लास्टीकचा वापर शरीरासाठी कसा घातक आहे , एनजीओच्या माध्यमातून करण्यात येत असलेली स्वच्छता विषयक कामे याबाबत माहिती दिली. घनकचरा व्यवस्थापन विभागाने आयोजिलेल्या जिंगल स्पर्धा चित्रकला स्पर्धा, पथनाटय स्पर्धा, भित्तीचित्र स्पर्धेतील विजेत्यांना पाच हजार, तीन हजार आणि दोन हजार रुपये आणि सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.
महापालिकेस स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहकार्य करणाऱ्या एनजीओ, इतर सामाजिक संस्था, स्वच्छता चॅम्पीयन, प्रभागात चांगली स्वच्छता राखणारे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते आणि भरत पवार यांचा सत्कार करण्यात आला. स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, मुकादम व सफाई कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे यापुढे महापालिका क्षेत्र स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी विविध माध्यमातून महापालिकेस सहकार्य करणासाठी तयारी दर्शविलेल्या ५ नागरीकांना प्रातिनिधिक स्वरुपात "पर्यावरण रक्षक" म्हणून ओळखपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास उपायुक्त अतुल पाटील, धैर्यशील जाधव आणि सचिव संजय जाधव उपस्थित होते.