मुरलीधर भवार, कल्याण: कल्याण पश्चिमेतील काही प्रभागात पाणीटंचाई आहे. पुरेसा पाऊस पडूनही नागरिकांना पाणी मिळत नाही. पाणी प्रश्नासाठी बुधवारी दुपारी शिंदेसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर अर्धनग्न आंदोलन केले. त्यांनी दालनाबाहेरच ठिय्या मांडला होता.
खडकपाडा परिसरात असलेला पाण्याचा व्हॉल्व खाली दबला गेल्याने ठाणकर पाडा, बेतूरकर पाडा, शिवाजी नगर आदी भागांत पाणीपुरवठा होत नाही. याबाबत पाणी पुरवठा विभागाला, केडीएमसी आयुक्तांना वारंवार सांगून देखील या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने उगले यांनी आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाची गंभीर दखल घेत शिंदे सेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी शहरातील स्वच्छता, पाणी आणि रस्त्यावरील खड्डे या संदर्भात नागरीकांच्या तक्रारी येता कामा नये.
नागरीकांना नागरी समस्यांचा त्रास झाला तर ते लोकप्रतिनिधींकडे दाद मागतात. लोकप्रतिनिधींना नागरीकांनी मते देऊन निवडले आहे. त्यांच्याकडून तक्रारीचे निवारण झाले नाही तर लोकप्रतिनिधीला नागरीकांच्या रोषाला सामाेरे जावे लागते. याच कारणास्तव माजी नगरसेवक उगले यांनी आंदोलन केले. प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरीता त्यांनी अर्धनग्न आंदोलन केले. त्यात गैर काही नाही. आमच्या कोणत्याही नगरसेवकाला अर्धनग्न आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, अन्यथा आम्ही अधिकाऱ्यांचे कपडे काढू, असा इशाराही भाईर यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.