लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: एमआयडीसीतील अमुदान कंपनीत झालेल्या स्फोटात ११ ठार तर ६८ जण जखमी झाले. जखमींपैकी ११ जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याचे कल्याण-डोंबिवली महापालिकेने सोमवारी सांगितले. मात्र, मागील आठवड्यात या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ठाणे क्राइम ब्रँचने मृतांची संख्या १३ असल्याचे त्यांच्या प्रेसनोटमध्ये जाहीर केले होते, तर डोंबिवली पोलिस १२ लोक अजून बेपत्ता असल्याचा दावा करीत आहेत. त्यामुळे स्फोटाचे नेमके बळी किती याबाबत यंत्रणांमध्ये एकवाक्यता नसल्याचे समोर आले आहे.
आतापर्यंत ११ मृतदेह सापडले असून, त्यातील केवळ तीन मृतदेहांची ओळख पटवून ते नातेवाइकांच्या ताब्यात दिले आहेत. याव्यतिरिक्त आतापर्यंत आढळलेले काही शरीराचे भाग डीएनए सॅम्पल घेणे, इत्यादी कार्यवाही करण्यात येत आहे. यापूर्वी घेतलेले सॅम्पल पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
आजही महापालिकेचे अग्निशमन पथक आणि इतर अधिकारी व कर्मचारी, एमआयडीसीचे अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळावर हजर असून, मलबा उचलण्याचे काम सुरू आहे. गेल्या आठवड्यात ठाण्याच्या क्राइम ब्रँचने जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकात स्फोटात १३ जण मृत असल्याचे जाहीर केले होते. आता महापालिकेने मृतांची संख्या ११ असल्याचा दावा केला. त्यामुळे यंत्रणांमध्ये एकवाक्यता नसल्याचे निदर्शनास आले.
अहवालानंतर आकडेवारीवर शिक्कामोर्तब
एसीपी सुनील कुराडे यांनी सांगितले की, १२ जण बेपत्ता असल्याची माहिती त्यांना आजूबाजूच्या कंपन्यांमधून दिली आहे. बेपत्ता लोकांची संख्या जर एवढी मोठी असेल तर मृतांची संख्या वाढणार आहे. पोलिस, महापालिका यांना जेवढ्या जलद गतीने फॉरेन्सिक अहवाल प्राप्त होतील, त्यातून मृतांच्या नेमक्या आकडेवारीवर शिक्कामोर्तब होईल.