डोंबिवलीः पूर्वेकडील कल्याण शीळ रोड लगत असलेल्या पलावा येथील २५ हजार फ्लॅटधारकांना आयटीपी प्रकल्पात समाविष्ट करत मालमत्ता करात सूट देण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली होती. रविवारी पलावा येथे फ्लॅट धारक आणि पाटील यांच्यात पार पडलेल्या बैठकीत मालमत्ता करात सूट देण्यासाठी केडीएमसीला १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्याचा निर्णय घेण्यात आला. सूट न दिल्यास रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा आमदारांसह रहिवाशांनी मनपाला दिला आहे.
पलावामधील २५ हजार फ्लॅट धारकांना महापालिकेकडून मालमत्ता कराच्या वसूलीकरीता जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पलावा येथील प्रकल्प हा आयटीपी प्रकल्प आहे. या प्रकल्पधारकांना नियमानुसार मालमत्ता करात ६६ टक्के सूट देण्यात यावी अशी मागणी आमदार पाटील यांच्याकडून सातत्याने केली गेली आहे. यासंदर्भात पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांची भेट देखील घेतली होती. रविवारी पलावा येथील कासा रिओ क्लब हाऊसमध्ये मालमत्ता करात सूट देण्यासह इतर समस्यांबाबत बैठक पार पडली .या बैठकीस पाटील यांच्यासह मोठय़ा प्रमाणात फ्लॅटधारक उपस्थित होते.
महापालिकेने ४० कोटी रुपये आधीच वसूल केले आहेत. हे जास्तीचे पैसे परत करावे अथवा ते मालमत्ता कराच्या बिलात अॅडजस्ट करावे अशी मागणी फ्लॅटधारकांची आहे. यावर पालिका आयुक्तांची भेट घेतली होती. ही मागणी प्रशासनाकडून मान्य करण्याबाबत सकारात्मकता दाखविण्यात आली होती पण अंमलबजावणी झाली नाही. यामध्ये राजकारण होत असून या कामाचे श्रेय मनसे आमदाराला मिळू नये हा त्या मागचा उद्देश असल्याकडे लक्ष वेधणारे व्टिट पाटील यांनी केले होते. शिंदे गटातील मोठ्या लोकप्रतिनिधी चा आयुक्तांवर दबाव असल्याचे त्यात नमूद केले होते.
दरम्यान रविवारच्या बैठकीत मालमत्ता कराबाबत निर्णय घेण्यासाठी फ्लॅटधारकांची एक समिती स्थापन करुन त्यांच्या माध्यमातून प्रशासनाकडे मालमत्ता करात सूट देण्याची मागणी लावून धरण्याचा निर्णय घेण्यात आला. केडीएमसी प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टीमेट देण्यात आला. यात करात सूट देण्याचा निर्णय न घेतल्यास प्रशासनाच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला. यावर आता महापालिका काय निर्णय घेते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या बैठकीत देसाई खाडी प्रदूषण , पलावा जंक्शन येथे होणारी वाहतूक कोंडी , समाजकंटकांकडून होणारा त्रास याबाबत देखील चर्चा करण्यात आली.