कल्याण: बलात्कार, पॉक्सो व पासपोर्ट कायदाच्या कलमातून आलोमिन अब्दुल रशीद शेख याची कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर. अष्टूरकर यांनी बुधवारी निर्दोष मुक्तता केली. लग्न करण्यावरून घरच्यांसोबत झालेल्या भांडणामुळे एक १५ वर्षीय तरुणी ऑक्टोबर २०१५ मध्ये घरातून पळून आली. यावेळी, तिची आलोमीनसोबत ओळख झाली. याच ओळखीतून आलोमीन तिला उल्हासनगर येथे घेऊन आला.
आठवड्यानंतर आलोमीनने तिच्यावर जबरी संभोग केला. या घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने त्याची नजर चुकवून घरातून पोबारा केला. रेल्वे स्थानकावर बसलेल्या पिडीतेची रेल्वे पोलिसांनी चौकशी केली असता सदर प्रकार उघडीस आला. याप्रकरणी पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरून हिललाईन पोलिसांनी आलोमीनला अटक केली. कल्याण न्यायालयात त्याच्या विरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. सुनावणीत आलोमीनविरोधात सबळ पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे, न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. आलोमीनच्या वतीने वकील तृप्ती पाटील यांच्यासोबत त्यांचे सहकारी वकील विद्या रसाळ व वकील रश्मी पेंडसे यांनीही काम पाहिले.
यामध्ये अपहरणाचे कलम पण आहे. परकीय नागरिकांचा कायदामध्ये त्याला पाच वर्षाची सजा दिली आहे. परंतु, गेली सात वर्षे, तीन महिने व २२ दिवसांपासून कारागृहात असलेल्या आलोमीनची लवकरच मुक्तता होईल असे वकील पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.