लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली: भिवंडी लोकसभा मतदारसंघात खासदार कपिल पाटील व भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्यामध्ये अनेकदा खटके उडाले असताना त्यांच्यातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाटयावर आला आहे. माजी मंत्री असलेल्या जगन्नाथ पाटील यांनी कपिल पाटील यांच्याविरोधात काम करणा-या किसन कथोरे यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. निवडणुकीत कथोरेंनी पाटील यांच्याविरोधात काम केल्याचे पुरावे असल्याचा गौप्यस्फोट माजी मंत्री पाटील यांनी केला आहे.
कपिल पाटील आणि किसन कथोरे यांच्यात निवडणुकीच्या आधीपासूनच आलबेल नसल्याचे वेळोवेळी दिसून आले होते. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी या दोघांमध्ये समजुत काढण्याचा प्रयत्न केला होता. भिवंडी लोकसभा निवडणुकीत दोघांमध्ये आलबेल असल्याचे दाखविले गेले परंतू मतदानानंतर सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत एका मुलाखतीमध्ये पाटील हे किसन कथोरेंवर नाराज असल्याचे दिसले होते. आता तर भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी कपिल पाटील यांना पराभूत करण्यासाठी किसन कथोरे यांनी समर्थकांमार्फत प्रयत्न केल्याचा आरोप करीत कथोरेंची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.
जगन्नाथ पाटील यांच्या पत्रात कथोरे यांनी मुरबाड विधानसभेतील आगरी भागात तुतारी म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बाळ्या मामा यांना तर ,कुणबी भागात शिलाई मशीन म्हणजे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना मतदान करायला कार्यकर्त्यांना सूचना केली या संदर्भातले माझ्याकडे सर्व पुरावे असल्याचे म्हंटलय.