डोंबिवली - शहरातील फेज २ मध्ये असलेल्या एका कंपनीत दुपारी मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे कंपनीला भीषण आग लागली. कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला असं सांगितलं जात होतं. परंतु जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच अशी माहिती स्टीम बॉयलरचे संचालक धवल अंतापूरकर यांनी दिली आहे.
धवल अंतापूरकर म्हणाले की, बॉयलर हा शब्द सर्वश्रूत आहे. रिएक्टर माहिती नसतं. त्यामुळे काहीही स्फोट झाला तर बॉयलर संबोधलं जातं. त्यामुळे माध्यमांशी शहानिशा करून माहिती द्यावी. बऱ्याचदा रिएक्टर असेल किंवा एअर रिसिव्हर टँक फुटला तरी बॉयलर स्फोट झाला हे सांगतात. ज्या कंपनीत स्फोट झाला तिथे कुठल्याही प्रकारचा बॉयलर वापरात नाही हे पडताळणीत आम्हाला आढळलं. त्यामुळे हा बॉयलरचा स्फोट नसून हा रिएक्टरचा स्फोट असल्याचं दिसून येते असं त्यांनी सांगितले.
तसेच प्रत्येक बॉयलरचं मग ते छोटा असो, वा मोठा त्याचं १०० टक्के निरिक्षण केले जाते. परवानगीशिवाय बॉयलर चालवू शकत नाही. बॉयलर चालवण्यासाठी प्रशिक्षित कामगार असतो ज्यांना आम्ही प्रमाणित केलेले असते. डोंबिवलीत सध्या ९० बॉयलर आहेत जे चालू आहेत तर २० बॉयलर बंद पडलेले आहेत अशी माहितीही धवल अंतापूरकर यांनी दिली.
नेमकं काय घडलं?
डोंबिवलीच्या एमआयडीसी फेज-२ मधील एका कंपनीत गुरुवारी भीषण स्फोट झाला. एमआयडीसी फेस दोन मधील अमुदान केमिकल कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटात कंपनीतील ६ जणांचा मृत्यू झाला तर ५० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. स्फोटानंतर अग्निशामक दलाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले, रात्री उशिरापर्यंत कंपनीला लागलेली आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं. परंतु डोंबिवलीतील या स्फोटामुळे आजूबाजूच्या इमारतीच्या काचा देखील फुटल्या. पार्किंगला असणाऱ्या गाड्यांच्या काचा फुटल्या. जवळपास २ ते ३ किमी परिसरात या स्फोटाच्या आवाजानं नागरिकांमध्ये दहशत पसरली.