कल्याण: भेसळयुक्त डिझेलचा साठा आणि विक्री करणा-या टोळीचा कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. आडीवली गावातील एका बांधकाम सुरू असलेल्या गाळयात टाकलेल्या छाप्यात सुमारे 12 हजार लिटर भेसळयुक्त डिझेल जप्त करण्यात आले असून याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 30 लाख 86 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मानपाडा परिसरातील आडवली गावात काही व्यक्ती बेकायदेशीरपणो मिनिरल टरपेंट ऑईल व बेस ऑईल यांचे मिश्रण करून त्यामध्ये रासायनिक रंग मिसळुन भेसळयुक्त बायो डिझेलची निर्मिती व साठा करून त्याची विक्री करीत आहेत अशी माहीती कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक संजु जॉन यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार ठाणो शिधावाटप उपनियंत्रक कार्यालयाचे पुरवठा अधिकारी एकनाथ पवार, राजेश पाटणकर, राजेश सोनार यांच्यासह संबंधित ठिकाणी बुधवारी पहाटे छापा टाकला असता त्याठिकाणी पाच व्यक्ती गाळयातील 5 हजार लिटर क्षमतेच्या एकुण 8 टाक्या एकमेकांना पी.यु.सी पाईपद्वारे जोडुन त्यामध्ये मिनिरल टर्पेंट ऑईल, बेस ऑईल व नारंगी रंगाचे रसायन द्रव यांचे मिश्रण करून भेसळयुक्त बायो डिझेल निर्मिती करीत असताना आढळुन आल्या.
गाळयातील टाक्यातून इलेक्ट्रिक मोटारद्वारे भेसळयुक्त बायो डिझेल टँकर आणि पिकअप वाहनातील टाक्यांमध्ये विक्री करता भर असताना निदर्शनास पडले. भेसळयुक्त डिझेलसह अन्य रसायन आणि दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत. पवन यादव, कृष्णा शुक्ला, रोहन शेलार, पंकज सिंग, विपुल वाघमारे अशी पाच अटक आरोपींची नावे आहेत. त्यांना गुरूवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना 21 डिसेंबर्पयत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरिक्षक भूषण दायमा, पोलीस उपनिरिक्षक नितीन मुदगून, मारूती दिघे, शरद पंजे, पोलीस हवालदार दत्ताराम भोसले, विलास मालशेटे, नरेश जोगमार्गे, अरविंद पवार, प्रकाश पाटील, सचिन साळवी यांसह अन्य पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.