कल्याण-एमएमआरडीए हद्दीतील रिक्षा टॅक्सी मीटर रिकॅलीब्रेशन करण्यास सरकारने १ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ मिळवून देण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकारकडे मागणी केली होती. त्यांची मागणी सरकारने मान्य करीत रिक्षा टॅक्सी चालकांना दिलासा दिला आहे.
रिक्षा टॅक्सी चालकांकरीता एमएमआरडीए कार्यक्षेत्रत दीड किलोमीटर अंतराचे पहिल्या टप्प्याचे रिक्षा मीटर भाडे २१ रुपये होते. रिक्षा टॅक्सी चालकांनी भाडेवाढीची मागणी केली होती. त्यानुसार परिवहन खात्याने २१ रुपयांवरून २३ रुपये दीड किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील अंतराकरीता भाडेवाढ दिली. २ रुपये भाडेवाढ वाढले तरी मीटर २१ रुपयांचा पडत होता. त्यात रिकॅलिब्रेशन करण्यासाठी ३१ नोव्हेंबर २०२२ पर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर त्याला मुदतवाढ दिली गेली. १५ जानेवारी २०२३ पर्यंत मुदत होती. या मुदतीत रिकॅलिब्रेशन न केलेल्या रिक्षा टॅक्सी चालकांना प्रति दिनी ५० रुपये दंड आकारला जात होता. त्याला रिक्षा टॅक्सी चालकांनी विरोध केला. पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी केली गेली. हा विषय रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी खासदार शिंदे यांच्याकडे मांडला. १६ जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान रिकॅलिब्रेशन न केलेल्या रिक्षा चालकांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. मात्र ४ फेब्रुवारी ते ३१ मार्च अखेर रिकॅलिब्रेशन करण्यास मुभा दिली आहे. या कालावधीत रिकॅलिब्रेशन न केलेल्या रिक्षा चालकांना दंड आकारला जाणार नसला तरी ३१ मार्च अखेर्पयत रिकॅलिब्रेशन करणे बंधनकारक आहे. १ एप्रिलपासून रिकॅलिब्रेशन न केलेल्या टॅक्सी रिक्षा चालकांकडून प्रतिदिन ५० रुपये आणि जास्तीत जास्त ५ हजार रुपये दंड आकारण्यात येईल असे आरटीओ कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
एमएमआऱडीए कार्यक्षेत्रत काळ्य़ा पिवळया टॅक्सींची एकूण संख्या ५० हजार ४९६ आहे. त्यापैकी ३२ हजार ७६ टॅक्सी चालकांनी रिकॅलिब्रेशन केले आहे. तर ५ लाख ५५ हजार ९२६ रिक्षा चालकांपैकी २ लाख २१ हजार ५३७ रिक्षा चालकांनी रिकॅलिब्रेशन केलेले आहे.