डोंबिवली: पोलिस दलात भावाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवित एका महिलेला लाखोंचा गंडा घालणा-या भामटयाला मानपाडा पोलिसांनी सापळा लावून सोमवारी अटक केली. अरविंद अशोक निकम ( वय ३६) असे अटक आरोपीचे नाव असून त्याने तक्रारदार महिलेकडून ५५ हजारांचा मोबाईल आणि ८० हजार रूपये उकळले होते. त्याने आणखीन एका महागडया मोबाईलची मागणी केली होती. मोबाईल घेण्यासाठी आलेल्या अरविंदला पोलिसांनी घरडा सर्कल याठिकाणी जेरबंद केले.
तक्रारदार महिला डोंबिवलीत राहणारी असून तीची डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर भागात राहणा-या अरविंदची ओळख होती. तुमच्या भावाला पोलिस विभागात कामाला लावतो असे आमिष अरविंदने महिलेला दाखविले होते. महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने पोलिस मित्रमंडळाचे आणि आरोग्य खात्याचे ओळखपत्र दाखविले होते. पोलिस आणि आरोग्य विभागात कोणालाही नोकरी लावू शकतो असे अरविंदने महिलेला सांगितले होते. भाऊ लवकरच पोलिस विभागात रूजू होईल या आशेने महिलेने अरविंदच्या मागणीनुसार त्याला ८० हजार रूपये आणि एक ५५ हजार रूपयांचा महागडा मोबाईल घेऊन दिला होता. परंतू अनेक दिवस उलटूनही भावाला नोकरी लागली नाही. संबंधित महिलेला फसवणूक होत असल्याचे कळताच तीने मानपाडा पोलिस ठाणे गाठले आणि याबाबत तक्रार दिली. वरीष्ठ पोलिस निरिक्षक विजय कादबाने यांनी आरोपीच्या शोधासाठी सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रशांत आंधळे यांचे पथक नेमले होते.
आणखी एका मोबाईलचा हव्यास नडला
अरविंद त्या महिलेकडे आणखीन एक मोबाईल मागत होता. महिलेने मोबाईल देते असे सांगत त्याला घरडा सर्कल याठिकाणी बोलावून घेतले. तत्पुर्वी ही माहिती पोलिसांना देण्यात आली. तो मोबाईल घेण्यासाठी आला असता पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात अडकला.
कोणीही आमिषाला बळी पडू नये
नजीकच्या काळात मोठी पोलिस भरती होणार आहे. पोलिस भरती पारदर्शकपणे होत असते. त्यामुळे पोलिस भरतीकरीता नागरिकांनी कोणाच्याही आमिषाला बळी पडू नये. अशी जर कोणी पैशांची मागणी करीत असेल तर त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधवा असे आवाहन वरीष्ठ पोलिस निरिक्षक कादबाने यांनी केले आहे.