कल्याण-कृष्ण जन्माष्टमी निमित्त काल कल्याणमध्ये आयोजित कार्यक्रमास प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक आल्या होत्या. त्यांच्या कार्यक्रमाला नागरीकांनी एकच गर्दी केली होती. या कार्यक्रमात सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला होता. त्याचा व्हीडीओ देखील सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे सामान्यांना कोरोनाचे नियम सांगणारे प्रशासन आत्ता झोपी गेले आहे का असा संतप्त सवाल कोरोना नियमावलीचे पालन करणा:यांकडून उपस्थित केला जात आहे.
कल्याण पश्चिमेतील सॉलिटर हॉलमध्ये जन्माष्टमीचा संगीत कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक आल्या होत्या. त्यांची गाणी ऐकण्यासाठी नागरीकांनी एकच गर्दी केली होती. त्यात विशेषत: तरुण तरुणींचा जास्त समावेश होता. गाणी सुरु होताच अनेकांना त्यांच्या तोंडावर मास्क लावलेला नाही याचा विसर सोयीस्कर रित्या पडला. तसेच त्याठिकाणी सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला होता. कोरोना नियमावली पालन या ठिकाणी करण्यात आलेले नव्हते. या कार्यक्रमाचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यातून हे सगळे उघड होत आहे. एकीकडे नागरीकांना कोरोना निमयांचे पालन करण्याचे आवाहन सरकारकडून केले जात आहे. मात्र काहींनी कोरोना नियमांचे उल्लंघन केले तरी त्याची दखल सरकारी यंत्रणांकडून घेतली जात नसल्याचीच बाब यातून उघड झाली आहे.
लॉकडाऊनचे नियम सध्या तरी शिथील आहे. मात्र सर्व प्रकारात शिथीलता असताना नियम पाळले नाही तर कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. विशेषत: सणानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढणार अशी दाट शक्यता खुद्द राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केलेल्या शक्यतेपश्चात सरकारी यंत्रणा कोरोना नियमावली राबविण्यात भेदभाव करीत आहे का असाच सवाल या घटनेतून उपस्थित केला जात आहे. असा प्रकारची बेफिकरी ही कोरोनाच्या तिस:या लाटेला आमंत्रण देणारी ठरु शकते.