डोंबिवली: फेरीवाल्यांविरोधात सध्या सुरू असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ शिवगर्जना (भाजी व फळे विक्रेता संघ) या संघटनेने १३ डिसेंबरपासून छेडलेले बेमुदत उपोषण तुर्तास स्थगित केले आहे. पुर्नवसनाची कार्यवाही सुरू असून, उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती केडीएमसीकडून लेखी पत्राद्वारे केली होती. परंतु उपोषणकर्त्यांनी उपोषण सुरूच ठेवले होते. परंतू सोमवारी रात्री माजी सभापती दिपेश म्हात्रे यांनी मध्यस्थी करीत चर्चा केल्यानंतर आंदोलन तुर्तास स्थगित केले गेले.
नेहरू रोड, चिमणी गल्ली, मोठी गल्ली येथे ५० वर्षांपेक्षा अधिक जुने भाजी मार्केट आहे त्यांना प्राकृत बाजार घोषित करा, ना फेरीवाला क्षेत्र फलक हटवा, फेरीवाल्यांसाठी जागा संरक्षित करून, प्रमाणपत्र द्यावे, उच्च न्यायालयाच्या २०१४ च्या आदेशाचे पालन करा तसेच पी. एम. स्वनिधी लाभार्थींना केंद्र सरकारने संरक्षण दिले आहे त्याचे पालन करावे, आदी मागण्यांसाठी उपोषण छेडले होते. यावर शहर फेरीवाला समिती स्थापन होणार असून, रेल्वे स्थानकापासून १५० मीटर आतील फेरीवाल्यांची तात्पुरती फडके रोड येथे बसण्याची व्यवस्था केली जाईल, असे केडीएमसीकडून पत्र दिले होते. परंतु, ते फेटाळुन लावत उपोषण चालूच ठेवले होते. दरम्यान माजी सभापती दिपेश म्हात्रे यांनी सोमवारी रात्री भेट घेऊन चर्चा केल्यावर उपोषण तुर्तास स्थगित केले गेले. यावेळी म्हात्रे यांच्यासोबत युवासेनेचे सोनू सुरवसे आणि फ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि मी न्याय मिळवून देण्यासाठी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. बुधवारी आयुक्तांच्या दालनात बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे आंदोलन तुर्तास स्थगित करावे अशी विनंती म्हात्रे यांनी केली होती.
हॉकर्स व भाजी विक्रेता युनियनचे धरणे आंदोलन
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पथ-विक्रेत्यांची व्यवस्था करण्याबाबत टाळाटाळ करणा-या मनपा अधिका-यांच्या निषेध करण्यासाठी मंगळवारी हॉकर्स व भाजी विक्रेता युनियनच्या वतीने इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन छेडले होते.
आयुक्तांबरोबर उद्या बैठक
मनपा आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी केडीएमसीच्या मुख्यालयात बुधवारी फेरीवाला संघटनांची बैठक बोलावली आहे. यात काय चर्चा होते याकडे लक्ष लागले आहे.