सचिन सागरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: लठ्ठपणाच्या आजाराने ग्रासलेल्या एका १०० किलो वजनाच्या ४० वर्षीय रुग्णावर नवी मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. रुग्णाला फॅटी लिव्हरचे निदान झाल्याने पुढे जाऊन लिव्हर सिऱ्होसीस या गंभीर आजारास कारणीभूत ठरले. सासऱ्याने दिलेल्या यकृतामुळे या रुग्णावर डॉ. अमृत राज, डॉ. हिरक पहारी, डॉ. अंबरीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती यकृत प्रत्यारोपण संचालक डॉ. विक्रम राऊत यांनी कल्याणमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
उल्हासनगर येथे राहणाऱ्या आणि कॅटरिंगचा व्यवसाय करणाऱ्या संजय मोटवानी यांना बैठ्या कामामुळे वाढत्या वजनाची समस्या सतावू लागली. त्यांचा लठ्ठपणा भविष्यात फॅटी लिव्हरला कारणीभूत ठरला. आणि यकृताने सिरोसिससारखे गंभीर रुप धारण केले. जानेवारीमध्ये मोटवानी यांचे यकृताचे कार्य अचानाक बिघडले. यकृताचा जुनाट आजार आणि त्यात झालेली कावीळ यामुळे त्यांच्याकडून उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. त्यांच्या वाढत्या कावीळमुळे यकृताचे कार्य बिघडू लागल्याने डॉ. राऊत यांनी यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला.
पत्रकार परिषदेत डॉ. राऊत यांनी सांगितले की, मोटवानी यांच्या यकृताचे नुकसान हे लठ्ठपणामुळे होणाऱ्या फॅटी लिव्हर रोगामुळे होते. अशा रुग्णांमध्ये यकृताचा आजार वाढल्याने यकृत निकामे होते. यकृत प्रत्यारोपणाशिवाय या रुग्णांमध्ये ६० ते ७० टक्के मृत्यू होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे, या रुग्णांना तत्काळ यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता असते. आणि त्यांच्यासाठी प्रतीक्षा करणे जीवघेणे ठरते. मोटवानी यांच्या सासऱ्यांच्या उजव्या बाजूच्या यकृताचा वापर करण्यात आला आहे. मला कावीळ आणि सिऱ्होसीसचाही त्रास झाला. माझ्या सासऱ्यांनी दिलेल्या यकृतामुळे मला माझी दैनंदिन कार्य पुन्हा सुरु करता आल्याचे मोटवानी यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"