अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: गर्दीने ओसंडून वाहणारी आणि अस्वच्छतेने बरबटलेली रेल्वे स्थानके, स्वच्छतागृह नावाचे उकिरडे, दरवाजात लटकलेले प्रवासी असा प्रचंड शारीरिक वेदना आणि भयंकर मनस्ताप देणारा प्रवास नाईलाज म्हणून ठाणे जिल्ह्यातील २१ लाख चाकरमानी दररोज करतात. गर्दीत हात सुटला तर मृत्यूला कवटाळतात. टिटवाळा व बदलापूर येथून १५ डब्यांच्या लोकल सोडण्याचा प्रस्ताव सहा वर्षे कागदावर असून आर्थिक हितसंबंधांमुळे एसी लोकलची भलावण केली जात आहे. कधीही लोकल वेळेवर चालवल्या जात नाहीत, सदानकदा तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे सेवा कोलमडलेली असते. कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, उल्हानसगर, कल्याण, ठाकुर्ली, टिटवाळा, आसनगाव, कसारा, शहाड, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा, ठाणे या स्थानकांमधील प्रवाशांपैकी कुणी ना कुणी रेल्वेतून पडून होणारे अपघात नित्याचे झाले आहेत. सहप्रवासी क्षणिक दुःख व्यक्त करून पुन्हा पुढच्या प्रवासाला लागतात. घरातून सकाळी निघालेला माणूस पुन्हा घरी येईल याची शाश्वती नसते. किंबहुना तशी मानसिक तयारी करुन रेल्वेचा प्रवास करावा लागतो. वर्षानुवर्षे असेच सुरू आहे.
९४ पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यूलोहमार्ग पोलिसांकडील माहितीनुसार, जानेवारीपासून आतापर्यंत मध्य रेल्वेच्या लोकल मधून गर्दीमुळे पडून ९४ हून अधिक प्रवासी मरण पावले. अनेक जणांना अपंगत्व आले.
प्रकल्प अडकला ?लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे दररोज किमान एक ते दोन प्रवाशांचा मृत्यू होतो. काहींना कायमचे अपंगत्व येते. प्रवासी वहन क्षमता तत्काळ वाढविण्यासाठी १५ डबा लोकल फेऱ्या वाढवणे गरजेचे आहे.
मागील दहा वर्षांत एकही लोकल रेल्वेच्या ताफ्यात आलेली नाही. त्यामुळेच ठाणे व कल्याणवरून कर्जत व कसाऱ्यासाठी एकही लोकल वाढलेली नाही. गर्दीच्या विभाजन नियंत्रणाचे कोणतेही नियोजन न करता एसी लोकल लादण्याचा रेल्वेच्या कमिशन बाज अधिकाऱ्यांचा डाव आहे. बदलापूर व टिटवाळा येथून १५ डबा लोकल चालविण्याचा प्रकल्प मुद्दाम प्रलंबित ठेवला आहे. - मनोहर शेलार, संस्थापक अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ
४२५ कोटी रुपयांचा प्रकल्प सहा वर्षे कागदावर- पाचवा, सहावा मार्ग शोभेचा ठरला असून कोट्यवधी रुपये वाया गेले. कल्याण ते मुंबई १५ डब्यांची लोकल सुरू केल्यानंतरही वाढणारी गर्दी व नियमित होणारे अपघात पाहून टर्मिनल स्थानके असलेल्या बदलापूर व टिटवाळा येथील सर्व लोकल १५ डब्यांच्या कराव्यात, अशी मागणी रेल्वे प्रवासी महासंघाने मध्य रेल्वे प्रशासन आणि रेल्वे बोर्डाकडे केली. - रेल्वे प्रशासनाने यासाठी प्रकल्प अहवाल तयार करून तो रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवून सहा वर्षे झाली. मात्र अजून त्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली नाही. - ४२५ कोटी रुपये खर्च असलेल्या या प्रकल्पात शहाड, आंबिवली, टिटवाळा, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकांची लांबी वाढवणे, सिग्नल यंत्रणा बदलणे या प्रमुख कामांसह अन्य प्रवासी सुविधांचा समावेश आहे.