कल्याण : कोविडने केडीएमसी प्रशासनाला कामं करण्याची सकारात्मक मानसिकता दिली. कोविडशी यशस्वी लढा देण्यासोबतच आम्ही शहर विकासासाठीही अक्षरशः झपाटल्याप्रमाणे काम करू शकलो. हे केवळ आपल्या एकट्यामुळे नव्हे तर महापालिकेच्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यामुळे शक्य झाले, असे मत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त आणि तत्कालीन केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी व्यक्त केले. केडीएमसीच्या कोरोना लढ्यावर आधारित गौतम कोतवाल लिखित कॅप्टन कूल कूल पुस्तकाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कल्याणच्या के.सी. गांधी शाळेच्या सी.एम. गांधी ऑडीटोरियममध्ये झालेल्या या दिमाखदार सोहळ्याला शहरातील अनेक मान्यवर व्यक्ती, सामाजिक संस्था आणि केडीएमसी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कॅप्टन कूल कल्याण डोंबिवली महापालिकेचा करोना विरोधी लढा’ हे पुस्तक ग्रीन वर्ल्ड प्रकाशनाचे गौतम कोतवाल यांनी लिहिले आहे. कोवीड काळात तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी कल्याण डोंबिवलीतील खासगी डॉक्टर, सामाजिक संस्था आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने कशाप्रकारे आरोग्य यंत्रणा उभारून कोवीडला हरवले याचे यथार्थ वर्णन या पुस्तकात करण्यात आले आहे.
दरम्यान, कोविड काळात दिलेल्या सेवेबद्दल कल्याण नागरी सत्कार समितीतर्फे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे , डॉ. विजय सुर्यवंशी आणि डॉ. प्रशांत पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
- महाराष्ट्रात कोविडचा सर्वात पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीत दगावला. मात्र त्यानंतरही हिंमत न हारता आम्ही तत्काललीन पालकमंत्री आणि विद्यमान मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय कमी वेळात जंबो कोविड हॉस्पिटल उभारून एकही रुग्ण उपचाराशिवाय राहणार नाही याची खबरदारी घेतली. सर्वाधिक रुग्ण असूनही कल्याण डोंबिवलीचा मृत्युदर मात्र कमी ठेवण्यात आम्हाला यश मिळाल्याचे समाधान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.
- कोविडने आपल्याला भरपूर काही शिकवले. समोर कितीही मोठा शत्रू किंवा संकट असेल तरी आपण सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न केल्यास त्याला नक्कीच हरवू शकतो हा विश्वास कोविडने दिल्याची भावना डॉक्टर आर्मीचे प्रमूख आणि इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. कोविड काळात आम्ही अनेक गोड आणि कटू आठवणींचा अनुभव घेतला असेही ते म्हणाले.