कल्याण - दिवा-आगासन रस्त्याचे काम सुरु आहे. या रस्त्यावर काल एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी कंत्राटदार अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ठाणो महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
दिवा आगासन रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरु आहे. साधरणत: दीड किलोमीटरच्या रस्त्यासाठी इतका वेळ लागतो. कंत्राटदार आणि महापालिकेचे अधिकारी वेळकाढू पणाचे धोरण अवलंबित असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला आहे. काल 7 डिसेंबर रोजी या रस्त्यावर मयूर धानसई या तरुणाचा अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस कंत्राटदार आणि अधिकारी जबाबदार आहेत. त्यांनी रस्त्याचे काम लवकर मार्गी न लावल्याने रस्ते अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे. रस्त्याचे काम सुरु असताना कंत्राटदाराने सुरक्षा विषयक उपाययोजना केल्या नव्हता. त्याची खबरदारीही घेतली नाही. ठिकठिकाणी रस्त्याचे काम सुरु असल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे. काही दिवसापूर्वी आमदार पाटील यांनी दिवा परिसरातील विकास कामांचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी रस्त्याचे काम लवकर मार्गी लावा. काम सुरु असताना सुरक्षिततेच्या उपाययोजना पाळा असे सूचित केले होते. त्यांच्या सुचनेकडे कंत्राटदार आणि अधिकारी वर्गाने दुर्लक्ष केल आहे. त्यामुळेच एका तरुणाला जीव गमाविण्याची वेळ आली. वास्तविक पाहता हा रस्ता महत्वाचा आहे. या रस्त्याचे काम युद्धपातळीवर करणो आवश्यक होते. मात्र अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या नाकर्तेपणामुळे हे काम संथ गतीने सुरु आहे. तसेच रस्त्याचे काम सुरु असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला फेरीवाले बसतात. त्याचबरोबर गाडय़ांचे बेकायदेशीर पार्किग केले जाते. तरुणाच्या अपघात प्रकरणी केवळ वाहन चालकावर गुन्हा दाखल करुन चालणार नाही. तर त्याला जबाबदार असलेले कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.