कल्याण- मागील दोन वर्षापासून रखडलेल्या राज्यातील महापालिका नगरपरिषदा आणि नगरपालिकाच्या निवडणुकीची प्रक्रिया १५ दिवसात थांबलेल्या टप्प्यावरून पुढे सुरु करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यानंतर निवडणूक आयोगाने राज्यातील १४ महापालिकाना निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरु करण्याचे निर्देश देत कार्यक्रम आखून दिला होता. या कार्यक्रमानुसार १७ मेपर्यत अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याच्या आदेशाचे पालन करताना कल्याणडोंबिवली महापालिका प्रशासनाकडून अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.
१३३ नगरसेवकासाठी ४४ प्रभागात होणाऱ्या निवडणुकीची प्रभाग रचना १३ मे रोजी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पालिकेच्या मुख्य कार्यालयासह प्रभाग समितीच्या सर्व कार्यालयात प्रभाग रचना आणि सिमारचनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. रखडलेल्या महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना पालिका प्रशासनाकडून १ फेब्रुवारी रोजी त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार ४४ प्रभागाची प्रभाग रचना नागरिकाच्या हरकती सुचनासाठी प्रसिद्ध करण्यात आली होती.
हरकती मांडण्याच्या अखेरच्या दिवसापर्यत या प्रभाग रचनेविरोधात ९९७ हरकती प्राप्त झाल्या होत्या. यातील ३६४ हरकतीची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली असून प्रभागाची नावे बदलण्याच्या हरकतीची दखल निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली आहे. मात्र अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्या पूर्वीच १० मार्चला निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती.
आता पुन्हा एकदा न्यायालयाच्या निकालानुसार निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात आली असून कल्याण डोंबिवली महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. प्रभाग रचनेच्या सीमारेषा बदलण्याबाबत दाखल हरकतीपैकी काही हरकतीची दखल घेत २८,२९,३२,३७,३८,४२,४३ या ९ प्रभागाच्या सीमा बदलण्यात आल्याची माहिती निवडणूक उपायुक्त सुधाकर जगताप यांनी दिली. तर पुढील आठवड्या पासून मतदार यादीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सुरु केला जाणार आहे.