कल्याण- कल्याणडोंबिवली महानगरपालिका हद्दीत लसींचा तुटवडा असल्याने वारंवार लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. 16 ऑगस्टपासून 19 ऑगस्टपर्यंत लस उपलब्ध नसल्याने पालिकेचे लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागली होती. अखेर आता पाच दिवसांनंतर शनिवारी लसीकरण होणार असल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. लसच उपलब्ध होत नसल्याने कामावर जायचे तरी कसे? असा सवाल सामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची आकडेवारी दिलासादायक असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता लसीकरण मोहीम वेगाने राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. लसीचे दोन डॉस घेतलेल्या नागरीकांना लोकलने प्रवास करण्याची मुभा राज्य सरकारने दिली आहे. मात्र लसीकरण प्रक्रिया वेगाने होत नसल्याने अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत. लसींचा तुटवडा असाच राहिला तर कल्याण-डोंबिवली शहरातील सुमारे 15 लाखाहूनही अधिक नागरिकांचे लसीकरण कधी आणि कसे होणार? हा प्रश्न आहे. मात्र आता, पाच दिवसांनंतर शनिवारी लसीकरण पुन्हा सुरू होत असल्याने ठिकठिकाणच्या केंद्रावर नागरिकांची गर्दी होणार हे निश्चित.