डोंबिवली: शहरात शास्त्रीनगर इस्पितळात शवविच्छेदन सुविधा आठवडाभरात सुरू होणार असून महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी तसे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत. सार्वजनिक बांधकाम।मंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यासंदर्भात ते राज्यमंत्री असल्यापासून पाठपुरावा केला होता, अखेर मंत्रालयातून बुधवारी त्यासंदर्भातला अध्यादेश मंजूर होऊन महापालिका प्रशासनाला हिरवा कंदील।मिळाला. त्यासंदर्भात मंत्री चव्हाण यांनी सांगितले की, ते राज्यमंत्री असताना त्यांनी शास्त्रीनगर इस्पितळात ही सुविधा सुरू व्हावी यासाठी तेव्हा गृहमंत्रालय, आरोग्य मंत्रालय तसेच दिल्ली दरबारी जाऊन सगळा पाठपुरावा केला होता. मध्यंतरी त्याला खीळ बसली, परंतु पुन्हा महायुतीचे सरकार राज्यात येताच त्या प्रकरनाला चालना देऊन सर्व मंजुऱ्या, चाचण्या करून तो विभाग सुरू करण्याबाबत तांत्रिक मुद्दे पूर्ण केल्याचे सांगण्यात आले. जे जे हॉस्पिटलची तज्ञ डॉक्टरांचे पथक त्यासाठी नेमण्यात येते, त्यांनीही पाहणी केली होती, त्यांनी काही सूचना महापालिका आरोग्य विभागाला केल्या होत्या. त्यात प्रामुख्याने सीसी कॅमेरा मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या दलनाशी जोडणे, इलेक्ट्रीक पॉईंट आणि अन्य मुद्यांची पूर्तता करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आरोग्य विभागाने त्याची पूर्तता केली होती, अखेर त्याला मंत्रालयातून हिरवा कंदील मिळाला असून आता ती सुविधा अल्पावधीत सुरू होणार आहे.
रेल्वे अपघातात मयत झालेले प्रवासी, आत्महत्या केलेले , अन्य अपघातात मृत्यू झालेले तसेच इस्पितळात उपचारार्थ मयत झालेल्या काही घटनांमध्ये शवविच्छेदन प्रक्रिया करावीच लागते. मात्र ती सुविधा डोंबिवलित नसल्याने मयताच्या नातेवाईकाना कल्याणला रुक्मिणीबाई रुग्णालयात जावे लागते. तेथे आधीच खूप कामाचा ताण असल्याने अनेकदा मयत वेटींगवर असते, त्यामुळे नातेवाईकांना मृत्यूचे दुःख करायचे की मृतदेह लवकर हाती लागावा यासाठी प्रयत्न करायचे हा मोठा सवाल होता. ही अडचण वर्षांनुवर्षे सुरू असून दिवसेंदिवस ती समस्या गंभीर होत आहे. नातेवाईक, आप्तेष्ट आदींची ही अडचण लक्षात घेऊन चव्हाण यांनी त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खाते असताना त्या तांत्रिक बाबींची पूर्तता करून जागा उपलब्ध करून विभाग तयार केला. त्यात सर्व सुविधा सुरू करून आवश्यक तो स्टाफ तयार करण्याची तांत्रिक बाबींची पूर्तता करून घेतल्याचे सांगण्यात आले.
गतवर्षी रेल्वेत विविध अपघातामुळे २३५ जणांचा तर शहरातील चारही पोलीस ठाण्यात नोंद झालेले २३४ मृत्यू आशा एकूण ४६४ नागरिकांना शवविच्छेदन करण्यासाठी कल्याणला जावे लागले. त्यात गेलेला वेळ, नातेवाईकांचे झालेले हाल आदींमुळे मयताच्या कुटुंबीयांना एकूणच झालेला मनस्ताप आता यापुढे कमी होईल, आणि अल्पावधीत शवविच्छेदन करून नातेवाईक पुढील क्रियांना जाऊ शकतील, अशी सकारात्मक अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
गृह विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार महानगरपालिके अंतर्गत सामान्य रुग्णालय, शास्त्रीनगर, डोंबिवली येथे प्रस्तावित नवीन शवविच्छेदन केंद्र सुरु करण्याकरिता आवश्यक ती सर्व सुविधा उपलब्ध असल्याचे निरीक्षणे नोंदवून संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांचे ना हरकत देण्याकरिता संचालनालयामार्फत गठित त्रिसदस्यीय समितीने शिफारस केली होती, त्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले होते : रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री .