डोंबिवली: एरव्ही पाणी चोरीकडे दुर्लक्ष करणारे केडीएमसी आणि एमआयडीसी प्रशासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी मध्यरात्री टाकलेल्या धाडीनंतर खडबडुन जागे झाले असून पाणी चोरणाऱ्या १२ सर्व्हिस सेंटरसह अनधिकृत कनेक्शन प्रकरणी एकाच्या विरोधात यंत्रणांकडून मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
काही दिवसांपासून डोंबिवलीच्या ग्रामीण भागात पाणी कमी दाबाने किंवा येत नसल्याची तक्रार उद्योगमंत्री सामंत यांना मिळाली होती. त्याची दखल घेत सामंत यांनी अचानक मध्यरात्री डोंबिवली ग्रामीण परिसरात धाड टाकत टँकर माफीयांच्या वतीने सुरु असलेल्या पाणी चोरीचा पर्दाफाश केला होता. दरम्यान केडीएमसीच्या अधिका-यांनी त्याठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. यातून महापालिकेच्या कनेक्शनवरून कोणताही अनधिकृत टँकर किंवा पाणीपुरवठा होत नाही असा दावा केला आहे. यावरून मंत्री सामंत यांनी टाकलेली धाड फोल ठरली का अशी चर्चा रंगली असली तरी मंत्र्यांनी टाकलेल्या अचानक धाडीने झोपी गेलेल्या सरकारी यंत्रणांना अखेर जाग आल्याचे पाणीचोरी प्रकरणी दाखल केलेल्या गुन्हयांच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे. पाणी चोरणा-या तब्बल १२ सर्व्हिस सेंटर चालविणा-यांवरोधात गुन्हे नोंदवले गेले आहेत.बदलापूर-पाईप लाईन रोडवरील खोणी, कोळेगाव, रूक्मिणीनगर, हेदुटणे, धामटण या परिसरात ही कारवाई करण्यात आली. डोंबिवली एमआयडीसी येथील कंपन्यांना, केडीएमसी अंतर्गत येणारी २७ गावे आणि इतर गृहसंकुले यांना पाणी पुरवठा करणा-या तीन मुख्य जलवाहीन्यांना टॅपिंग मारून सर्व्हिस सेंटर चालक पाणी चोरून वापरत असल्याचे कारवाईत उघड झाले. तर ई प्रभाग क्षेत्र परिक्षेत्रातील संदप रोड परिसरात अनधिकृत रित्या कनेक्शन घेऊन पाणी चोरी करणा-याविरोधात देखील गुन्हा नोंद करण्यात आला आहे.